माजलगाव : तालुक्यात साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, यासाठी युवा शेतकरी संघर्ष समितीने सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, आंदोलनकर्ते व कारखानदार यांच्यात मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीदरम्यान लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना व जय महेश साखर कारखाना यांचा २७७५ रुपये तर छत्रपती सहकारी साखर कारखाना २७५० रुपये पहिला हप्ता देण्याचा ठराव करण्यात आला.
साखर कारखानदारांनी उसाचा दर जाहीर करावा यासाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन, कोयता बंद, वाहतूक बंद आंदोलन करण्यात आले. आमदार प्रकाश सोळंके यांचा लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, मोहन जगताप यांचा छत्रपती सहकारी साखर कारखाना व खासगी तत्त्वावर चालणारा सर्वाधिक क्षमतेचा जय महेश शुगर्स इंडस्ट्रीज हा कारखाना व अनेक गुळ कारखाने आहेत. वरील मागणीसाठी ७ तास युवा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलने केली. यानंतर एकरकमी ऊसभाव वाढ झाली नाही. बीड जिल्हाधिकारी यांच्या सोबतची आंदोलनकर्त्यांची बैठक निष्फळ झाली. शेतकरी संघर्ष समितीने कोयता बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने ऊस वाहतूक होत नसल्याने साखर कारखाने बंद पडू लागले. त्यामुळे हादरलेल्या आमदार प्रकाश सोळंके, मोहन जगताप, जय महेशचे नारायण मूर्ती यांनी मंगळवार, २ डिसेंबर रोजी रात्री सर्व आंदोलकांसोबत बैठक घेतली. यावेळी माकपचे नेते अजित नवले, जगदीश फरताडे, अजय बुरांडे, विठ्ठल लगड, दत्ता डाके, मोहन जाधव, अॅड.नारायण गोले, सुहास झोडगे यांच्यासह अनेक जण बैठकीस उपस्थित होते.
एकरकमी रक्कम २४०० च्या पुढे भाव देणार नसल्याच्या पावित्र्यावर असलेले कारखानदार या आंदोलनाने नमले असून, लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना, जय महेश साखर कारखाना यांच्याकडे उपपदार्थचे प्रकल्प असल्याने त्यांनी एकरकमी २७७५ रूपये तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याकडे कसलेच इतर प्रकल्प नसल्याने त्यांना २५ रूपयाची सूट देऊन २७५० रूपये देण्याचे या बैठकीत निश्चित झाले. या बैठकीत झालेल्या चर्चेतून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळला असल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाचे मोठे यश आहे.




Comment here