आपला जिल्हा

सीमा नेपाळची, उपचार माजलगावात; कर्करोगग्रस्त रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया!

शासकीय योजनांची मर्यादा ओलांडून डॉ.यशवंत राजेभोसले यांनी जपला माणुसकीचा धर्म; ग्रामीण आरोग्यसेवेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

माजलगाव : कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी आता केवळ महानगरांचीच वाट धरावी लागेल, असे नाही, हे माजलगावने सिद्ध करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. थेट नेपाळमधील कर्करोगग्रस्त रुग्णाने उपचारासाठी माजलगावची निवड केली आणि येथील गुरुकृपा होलिस्टिक कॅन्सर वेलनेस आरोग्यधाम अंतर्गत यशवंत रुग्णालयात त्याच्यावर मोठ्या आतड्याच्या कर्करोगाच्या ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यास मर्यादा असतानाही आर्थिक परिस्थिती आणि देशाच्या सीमा यांचा विचार न करता डॉ.यशवंत राजेभोसले यांनी पुढाकार घेत अत्यल्प खर्चात उपचाराची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे माजलगावच्या ग्रामीण आरोग्यसेवेची चर्चा आता देशाच्या सीमाही ओलांडू लागली आहे.

नेपाळमध्ये कर्करोगावरील उच्चस्तरीय उपचारांच्या मर्यादांमुळे संबंधित रुग्णाने भारतात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. नवी दिल्लीतील रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी तब्बल पाच ते सात लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत माजलगाव येथील गुरुकृपा आरोग्यधामची माहिती मिळाल्यानंतर रुग्णाने उपचारासाठी माजलगाव गाठण्याचा निर्णय घेतला. गुरुकृपाचे संस्थापक डॉ.यशवंत राजेभोसले यांनी रुग्णाची परिस्थिती आणि त्याच्या वेदना समजून घेत शासकीय योजनांच्या लाभाची मर्यादा बाजूला ठेवून उपचारासाठी पुढाकार घेतला.

नेपाळमधून भारतात दाखल झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर या रुग्णाचे आगमन झाले. तेथून गुरुकृपा आरोग्यधामच्या आरोग्य रथ आणि डिजिटल आरोग्य वाहिनीच्या माध्यमातून त्याला थेट माजलगाव येथे आणण्यात आले. परदेशी नागरिक असल्याने भारत सरकारच्या आरोग्यविषयक शासकीय योजनांचा लाभ मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे उपचारासमोर आर्थिक आणि प्रशासकीय मर्यादा होत्या. मात्र, या मर्यादांपेक्षा माणुसकीला प्राधान्य देत डॉ.राजेभोसले यांनी उपचाराची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णाच्या मोठ्या आतड्याला झालेल्या कर्करोगाच्या ट्युमरवर तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून ती यशस्वी केली. प्रसिद्ध सर्जन डॉ.युवराज कोल्हे, डॉ.महेश काळे, भूलतज्ज्ञ डॉ.शिवाजीराव काकडे आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ.यशवंत राजेभोसले यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया पार पाडली.

या घटनेचे विशेष महत्त्व म्हणजे, उपचारासाठी नेहमी मुंबई, पुणे, हैदराबाद किंवा दिल्लीसारख्या महानगरांकडे धाव घेणाऱ्या ग्रामीण रुग्णांसाठी माजलगावमध्येच दर्जेदार वैद्यकीय सुविधा उभ्या राहू शकतात, हा विश्वास या निमित्ताने निर्माण झाला आहे. नेपाळमधील रुग्णाने उपचारासाठी माजलगावची निवड करणे, ही येथील आरोग्यसेवेच्या दृष्टीने उल्लेखनीय बाब ठरली आहे.

गुरुकृपा होलिस्टिक कॅन्सर वेलनेस आरोग्यधामच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कर्करोगग्रस्त रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गंभीर आजाराच्या उपचारांसाठी महानगरांमध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करणे, प्रवास आणि निवासाचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करणे, या अडचणी ग्रामीण रुग्णांसमोर असतात. माजलगावमध्येच उपचारांची सुविधा उपलब्ध झाल्यास या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. नेपाळमधील रुग्णावरील ही यशस्वी शस्त्रक्रिया एका रुग्णापुरती मर्यादित नसून ग्रामीण आरोग्यसेवेच्या नव्या आशादायी पर्वाची सुरुवात मानली जात आहे.

पुढील उपचारांसाठीही माजलगावचीच निवड

शस्त्रक्रियेनंतर कर्करोगावरील उपचारांचा पुढील टप्पा म्हणून रुग्णाला केमोथेरपी आणि रेडिएशनची आवश्यकता आहे. हे पुढील उपचार तसेच आयुर्वेदातील पंचकर्म उपचार घेण्यासाठी पुन्हा गुरुकृपा आरोग्यधाममध्येच येणार असल्याचे रुग्ण आणि त्यांची मुलगी निकिता जैन यांनी सांगितले. त्यामुळे माजलगावच्या आरोग्यसेवेवर परदेशी रुग्णाने दाखविलेला विश्वास अधोरेखित झाला आहे.

देश, धर्म, भाषा नव्हे; रुग्णाच्या वेदना महत्त्वाच्या!

“रुग्ण कोणत्या देशाचा, जातीचा, धर्माचा आहे किंवा त्याची परिस्थिती काय आहे, यापेक्षा त्याच्या वेदना आणि त्याला आवश्यक असलेली आरोग्यसेवा आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या शहरांतील धावपळ आणि आर्थिक ओढाताण कमी करून त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हाच गुरुकृपा आरोग्यधामचा उद्देश आहे. प्रत्येक रुग्णाला सन्मान, संवेदनशीलता आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

— डॉ.यशवंत राजेभोसले, संस्थापक, गुरुकृपा होलिस्टिक कॅन्सर वेलनेस आरोग्यधाम, माजलगाव 

Comment here