आपला जिल्हा

देवठाणा-जैतापुर सिंगल फेज वीज कामात निकृष्ट दर्जा : सरपंच भागवत दराडे

धारूर : तालुक्यातील देवठाणा-जैतापुर येथे वीज कंपनीकडून सुरू असलेल्या सिंगल फेज वीज कामात गंभीर त्रुटी व निकृष्ट दर्जा आढळल्याचा आरोप सरपंच भागवत दराडे यांनी केला असून, संबंधित गुत्तेदार व अभियंत्यावर कारवाईची मागणी केली आहे.

देवठाणा-जैतापुर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत वीज कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या सिंगल फेज वीज कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा आरोप सरपंच भागवत दराडे यांनी केला आहे. संबंधित कांदे नामक गुत्तेदाराने अंदाजपत्रकाला बगल देत अभियंत्यासोबत संगनमत करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्त्याच्या कडेला पोल बसवण्याऐवजी मधोमध पोल उभारणे, सिमेंट काँक्रीटऐवजी दगड-माती वापरणे, तारा योग्य ताण न देणे, आवश्यक ठिकाणी पोल व तारा न बसवणे, तसेच ११ मीटरऐवजी ९ मीटर पोल उभारणे अशा अनेक त्रुटी कामात आढळल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच डीपी ठिकाणी अर्थिंग न केल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित गुत्तेदार व अभियंत्यावर कडक कारवाई करावी, तसेच गुत्तेदारास काळ्या यादीत टाकून दर्जेदार काम करून द्यावे, अशी मागणी दराडे यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

इंजिनिअर- गुत्तेदार संगनमताचा आरोप

देवठाणा-जैतापुर येथील वीज कामात संबंधित अभियंता व कांदे गुत्तेदार यांचे नाते असल्याने त्यांनी संगनमताने निकृष्ट काम केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारींवर उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने वरिष्ठांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सरपंच भागवत दराडे यांनी केली आहे.

Comment here