महा-राष्ट्र

भारतावर ‘हीट डोम’चा प्रभाव; उष्णतेचा कहर वाढला

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांमध्ये सध्या प्रचंड उकाडा जाणवत असून त्यामागे ‘हीट डोम’ ही हवामानातील विशेष स्थिती कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या परिस्थितीत उष्णता बाहेर न जाता वातावरणात अडकून राहते, त्यामुळे तापमान झपाट्याने वाढते.

सध्या भारतावर ‘हीट डोम’सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये तापमान सतत वाढत आहे. हीट डोम म्हणजे वातावरणाच्या वरच्या स्तरावर उच्च दाबाचा (High Pressure) मजबूत थर तयार होणे. हा थर जणू झाकणासारखा काम करतो आणि खालील गरम हवा वर जाऊ देत नाही. त्यामुळे सूर्याची उष्णता जमिनीच्या पातळीवर अडकून राहते. या प्रक्रियेत वरच्या स्तरातील हवा खाली सरकते (subsidence) आणि दाब वाढल्यामुळे तिचे तापमान अधिक वाढते. यालाच adiabatic warming असे म्हणतात. अशा वेळी तापमान उलट पद्धतीने वागते, म्हणजे वर थंड आणि खाली जास्त गरम अशी स्थिती तयार होते. यामुळे उष्णतेची लाट (Heatwave) अधिक तीव्र होते आणि पावसाची शक्यता कमी होते.

हवामान तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे ‘blocking pattern’ अनेक दिवस टिकू शकतात. तसेच जेट स्ट्रीमच्या हालचाली मंदावल्यामुळे ही परिस्थिती अधिक स्थिर राहते. अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांमध्येही यापूर्वी हीट डोमचा परिणाम दिसून आला आहे आणि आता भारतातही अशा घटनांची तीव्रता वाढत आहे.

महाराष्ट्रातही दीर्घकाळ उष्णता टिकून राहण्यामागे अशाच प्रकारच्या हवामान प्रक्रियांचा प्रभाव असू शकतो. याचा थेट परिणाम शेती, पाण्याची उपलब्धता आणि शहरांतील उष्णतेवर होतो. माती कोरडी पडणे, पाण्याची टंचाई वाढणे आणि ‘अर्बन हीट आयलंड’ प्रभावामुळे शहरांमध्ये अधिक उकाडा जाणवणे ही प्रमुख परिणामांची उदाहरणे आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हवामान बदल (Climate Change) आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशा हीट डोमच्या घटना अधिक वारंवार आणि तीव्र होत आहेत. त्यामुळे भविष्यात उष्णतेचे नवे विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comment here