आपला जिल्हा

माजलगावात मानाचा बैलपोळा दिमाखात!

शेटे कुटुंबीयांच्या बैलजोडीची पहिली मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात शहर दुमदुमले

माजलगाव : शेतकरी आणि बैलांच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला पारंपरिक बैलपोळा सण माजलगाव शहर व परिसरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे शहरातील मानाच्या शेटे कुटुंबीयांच्या बैलजोडीला मिरवणुकीचा पहिला मान मिळाला. शेटे कुटुंबीयांच्या बैलांची विधिवत पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर शहरातील पोळ्याच्या मिरवणुकांना सुरुवात झाली.

झेंडा चौक परिसरातील मानाचे शेतकरी विश्वनाथ विठ्ठलअप्पा शेटे यांच्या बैलांची प्रथम मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या बैलजोडीची ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. झेंडा चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक मस्जिद चौक, हनुमान चौक मार्गे पुढे गेली. हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली. त्यानंतर बैलांची विधिवत पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी सोमनाथ शेटे, पंचाक्षरी शेटे यांच्यासह शेटे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेटे कुटुंबीयांच्या मानाच्या मिरवणुकीनंतर शहरातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांच्या मिरवणुका काढल्या. यासोबतच गायी, वासरे यांनाही सजवून मिरवणुकीत सहभागी करण्यात आले. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि उत्साही वातावरणामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर बैलपोळ्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.

पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या परंपरेला यंदाही मान

माजलगाव शहरातील शेटे कुटुंबीयांकडे बैलपोळ्याच्या पहिल्या मिरवणुकीचा मान पिढ्यान्‌पिढ्या चालत आला आहे. या मानाच्या मिरवणुकीनंतरच शहरातील इतर शेतकरी आपल्या बैलजोड्यांच्या मिरवणुका काढतात. त्यामुळे शेटे कुटुंबीयांची ही मिरवणूक माजलगावच्या बैलपोळ्याचे प्रमुख आकर्षण ठरते. रात्री उशिरापर्यंत शहरात बैलपोळ्याच्या मिरवणुका उत्साहात सुरू होत्या.

Comment here