माजलगाव : माजलगाव धरणाची उंची 0.50 मीटरने वाढविण्याच्या प्रस्तावावरून जनतेमध्ये निर्माण झालेल्या समज-गैरसमजांना पूर्णविराम देण्यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी बुधवारी, दि.16 सप्टेंबर रोजी सुंदरराव सोळंके महाविद्यालयात पत्रकार परिषद घेतली. धरणाची उंची वाढविताना नव्याने जमीन संपादन करण्याची आवश्यकता भासणार नाही; मात्र सर्वेक्षणानंतर एकाही शेतकऱ्याची 1 आर (गुंठा) जमीन संपादित करावी लागणार असल्याचे आढळल्यास उंचीवाढीचा प्रकल्पच रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी स्पष्ट ग्वाही सोळंके यांनी दिली.
माजलगाव धरणाची सध्याची पूर्ण संचय पातळी (एफआरएल) 431.80 मीटर असून महत्तम पातळी (एमडब्ल्युएल) 434.80 मीटर आहे. धरणाची उंची 0.50 मीटरने वाढविल्यानंतर पूर्ण संचय पातळी 432.30 मीटरपर्यंत प्रस्तावित करण्यात आली आहे.
या उंचीवाढीमुळे अतिरिक्त 38.00 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार सोळंके यांनी दिली. हा प्रस्ताव जलसंपदा विभागाचा असून त्यासंदर्भातील मंजुरी 2008 मध्येच देण्यात आलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धरणाच्या महत्तम पातळीपर्यंतची जमीन यापूर्वीच संपादित करण्यात आलेली असल्याने अतिरिक्त जमीन संपादनाची आवश्यकता नसल्याचे जलसंपदा विभागाचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र संपादित जमिनीच्या हद्दी निश्चित करून अनेक वर्षे झाल्यामुळे सद्यस्थितीत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून हद्द निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर एकाही शेतकऱ्याची 1 आर जमीन नव्याने संपादित करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले, तर माजलगाव धरण उंचीवाढीचा प्रकल्प तातडीने रद्द करून घेण्यात येईल, असे सोळंके यांनी ठामपणे सांगितले.
अर्धवट पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावण्याची मागणी
धरणाच्या निर्मितीच्या काळात कवडगाव, खळवट, निमगाव तसेच तालखेडजवळील डुब्बा मजरा आणि इरला मजरा या गावांचे अर्धवट पुनर्वसन झाले आहे. या गावांचे पूर्ण पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. या गावांचे पूर्ण पुनर्वसन होणे गरजेचे आहे, असे आमदार सोळंके यांनी नमूद केले. मात्र पुनर्वसनासाठी आवश्यक असलेले भूसंपादन आणि धरणाची उंची वाढविण्यासाठीचे भूसंपादन हे दोन स्वतंत्र विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या सर्वेक्षणानंतर नव्याने भूसंपादन करण्याची आवश्यकता निर्माण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तरीही जर भूसंपादनाची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले, तर संपूर्ण प्रक्रिया बंद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
माजलगाव धरणातील गाळ काढण्यासाठी शासनाकडे मागणी
माजलगाव धरणातील गाळाचा प्रश्नही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. सन 2010 मध्ये करण्यात आलेल्या गाळ सर्वेक्षणानुसार धरणाची सुमारे 45.20 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता कमी झाल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. 2010 नंतर आणखी गाळ साचला असण्याची शक्यता असल्याने नव्याने गाळ सर्वेक्षण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सोळंके यांनी सांगितले. गाळ सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जायकवाडी प्रकल्पाच्या धर्तीवर माजलगाव धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून तो मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
कोकणातून मराठवाड्यात पाणी आणण्याच्या योजनांवरही काम
कोकणातून पाणी मराठवाड्यातील जायकवाडी तसेच अन्य धरणांपर्यंत आणण्याच्या दृष्टीने शासनाकडून काम सुरू असल्याचेही आमदार सोळंके यांनी सांगितले. राज्यात सुमारे 200 नवीन प्रकल्पांचे सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने 250 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. या प्रकल्पांचा बीड जिल्ह्याला मोठा लाभ होण्याची शक्यता असून धारूर, माजलगाव आणि वडवणी तालुक्यांचाही त्यात समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक गावांमधून धरण अथवा उपसा जलसिंचन प्रकल्पाची मागणी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून त्यासाठी शासन आग्रही आहे, असेही सोळंके यांनी सांगितले.
‘अफवांवर विश्वास ठेवू नका’
माजलगाव धरणाच्या उंचीवाढीच्या मुद्द्यावरून 22 प्रकल्पग्रस्त गावांतील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, असे आवाहन करत आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, “कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्वेक्षणानंतर जर एकाही शेतकऱ्याची 1 गुंठा जमीन संपादित करण्याची गरज निर्माण झाली, तर धरणाची उंची वाढविण्याची प्रक्रिया रद्द करण्यात येईल.” जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह माजलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे, बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती कल्याण आबुज, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, माजलगाव बाजार समितीचे माजी सभापती संभाजी शेजुळ, पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ.वसिम मनसबदार, नगरसेवक राहुल लंगडे, नगरसेवक विजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.



Comment here