आपला जिल्हा

चप्पूवर बसून डॉक्टरांकडून पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी

डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी; पूरग्रस्त सांडस चिंचोलीत रूग्णसेवेसह औषधी वाटप

माजलगाव : आठ ते ते दहा दिवसांपासून सिंदफणेच्या पाण्याचा वेढा असलेल्या सांडस चिंचोली येथे जीव धोक्यात घालून चप्पू वर बसून जात सुमारे ७०० रूग्णांची तपासणी करत औषध उपचार देत हृदयरोग तज्ञ डॉ. प्रताप लेंडाळ डॉ.अभिजीत सोळंके यांनी रूग्णसेवा केली. यावेळी दोन उच्च रक्तदाब रूग्णांना या डॉक्टरांच्या धाडसी सेवेमुळे तत्काळ आराम मिळाल्याचे असल्याने सांडस चिंचोली वासियांनी या डॉक्टरांचे आभार व्यक्त केले तर सामाजिक बांधीलकी जपल्याने या डॉक्टरांचे अभिनंदन होत आहे.

माजलगाव धरण तुडुंब भरल्याने अनेक दिवसांपासून सिंदफणा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून सांडस चिंचोली या गावाला अनेक दिवसांपासून पुराचा वेढा पडला आहे. तालुका प्रशासनाने अनेकवेळा इथे ड्रोनद्वारे औषध सामग्री पाठविली होती. अनेक दिवसांच्या पूर परिस्थितीमुळे या गावात डासांचा प्रादुर्भाव साथ साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झाला होता यामुळे ताप, सर्दी, खोकला, मधूमेह आणि उच्च रक्तदाब रुग्णांची संख्या वाढली होती. याचे गांभीर्य ओळखून येतील लेंडाळ हॉस्पिटलचे संचालक हृदयरोग तज्ञ डॉ.प्रताप लेंडाळ व डॉ.अभिजीत सोळंके यांनी तात्काळ आपल्या टीमला घेत सोबत औषधी सलाईन घेऊन सांडस चिंचोली वस्तीवर जात तेथून काही गावकऱ्यासोबत चप्पू वर बसून सांडस चिंचोली गाठले. तिथे थेट मारूती मंदिरात कॅम्प घेत रूग्णसेवा सुरू केली. यावेळी गंभीर २४० बल्डप्रेशर असलेल्या दोन रूग्णांवर उपचार करत त्यांना इंजेक्शनद्वारे औषध उपचार देण्यात आल्याने त्यांचा धोका टळला. यावेळी ५५ ते ६० रूग्णांना सलाईन देण्यात आले यावेळी लहान मोठ्या अशा ७०० रुग्णांवर उपचार करून त्यांना औषधी देण्यात आली. यावेळी डॉ.प्रताप लेंडाळ, डॉ.अभिजित सोळंके, दिगंबर कदम त्यांचा स्टाफ व श्रीकृष्ण शेजुळ, सोमा चंदनशिव, पांडुरंग माने सर्व गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. गावकऱ्यांनी या सेवेबद्दल व सामाजिक बांधिलकी जपल्याबदल डॉ.प्रताप लेंडाळ, डॉ.अभिजीत सोळंके व त्यांच्या टीमचे आभार मानले.

Comment here