एकाच कुटुंबावर दोन आघात; कांबळे कुटुंबाला अशोक डकांचा आधार
माजलगाव : तालुक्यातील ब्रह्मगाव येथील ऊसतोड मजूर बाळू रामभाऊ कांबळे यांचे कर्नाटक राज्यातील मुदुळ जिल्ह्यात दि. १४ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाले. तरूण वयात झालेल्या या दुर्दैवी घटनेने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, “मी कांबळे कुटुंबासोबत आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त करत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक डक यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुलाच्या अकाली जाण्याचा मोठा धक्का वडील रामभाऊ कांबळे यांना बसला. सतत मुलाच्या आठवणींनी व्याकूळ झालेल्या रामभाऊंनी या आघातातून स्वतःला सावरू शकले नाही. दुःखाच्या छायेत त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले. अखेर मुलाच्या निधनाचा धसका घेतलेल्या रामभाऊंना हृदयविकाराचा झटका आला आणि दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचीही प्राणज्योत मालवली.
अवघ्या महिन्याभरात मुलगा आणि वडील अशा दोन व्यक्तींचे निधन झाल्याने कांबळे कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक डक यांनी कांबळे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. “मी कांबळे कुटुंबासोबत आहे,” असा दिलासा देत त्यांनी कुटुंबाला धीर दिला. तसेच मुदुळ येथील संबंधित साखर कारखान्याकडून काही आर्थिक मदत मिळू शकते का, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय स्वतःतर्फेही आर्थिक मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला.
या वेळी मानवी हक्क अभियानचे तालुकाध्यक्ष मधुकर कांबळे, काँग्रेस सोशल मीडिया समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे, युवा नेते रमेश जाधव, अंजन कांबळे, नितीन कांबळे, मनोज गायकवाड, अरुण कांबळे, प्रशांत कांबळे, संतोष कांबळे, अनिल कांबळे, संग्राम कांबळे, नवनाथ लोखंडे, गणेश कांबळे, दादा कांबळे, समाधान कांबळे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. कांबळे कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.



Comment here