आपला जिल्हा

वाहतुकीचे नियम पाळले तर मृत्यूचे प्रमाण घटेल : अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर

जिल्हा वाहतूक शाखेच्या रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप उत्साहात

बीड : विद्यार्थी आणि नागरिकांनी रस्ता सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळल्यास रस्ते अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही घटेल, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केले. बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने दि. १ ते ३१ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप २० फेब्रुवारी रोजी पोलीस मुख्यालय मैदानावर संपन्न झाला. हे अभियान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार, राहुल कुमार (भा.पो.से.), पोलीस उपाधीक्षक (गृह) उमाशंकर कस्तुरे, राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अक्षय गव्हाणे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरज पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, शालेय रिक्षा युनियन प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. चंपावती विद्यालय, भगवान विद्यालय आणि शिवाजी विद्यालय येथील एनसीसी पथक तसेच स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी केले. सूत्रसंचालन के.बी. गाडेकर व एम.बी.शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

‘नियमांचे पालन हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली’

समारोप प्रसंगी बोलताना अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले की, वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. परवाना नसताना विद्यार्थ्यांनी वाहन चालवू नये. दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करणे बंधनकारक आहे. रस्त्यावर अपघात दिसल्यास जखमींना तत्काळ मदत करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण करणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comment here