विश्व वार्ता

‘अमेरिकेला असा धडा शिकवू की जग लक्षात ठेवेल!’ 

इराणच्या अली लारीजानी यांची ठाम भूमिका चर्चेत

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर अली लारीजानी यांचे नाव जगभरात चर्चेत आहे. अली लारीजानी सध्याच्या घडीला इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव आहेत. अली लारीजानी अनेक दशकांपासून इराण सरकारचा शांत आणि प्रॅक्टिकल चेहरा आहेत. उत्तम लेखक ते अण्वस्त्र चर्चांमधील समन्वयक असा त्यांचा आवाका आहे. १ मार्चला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर लारीजानी वेगळ्या अंदाजात जगासमोर आले आहेत.

 

इस्रायल, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई मारले गेले. यानंतर २४ तासांनी लारीजानी इराणच्या सरकारी वाहिनीवर आले. त्यांनी देशाला संबोधित केले. ‘अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या मनात आग लावली आहे. आता आम्ही त्यांची मनं पेटवू. आमचे शूर सैनिक आणि आमचा महान देश शत्रूला असा धडा शिकवेल की संपूर्ण जग लक्षात ठेवेल,’ अशा स्पष्ट शब्दांत लारीजानी यांनी अमेरिका आणि इस्रायलला ललकारले. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर तीन सदस्यीय परिषदेकडे इराणचे सुकाणू आले आहेत. लारीजानी यांचा समावेश याच परिषदेत होतो. त्यांना इराणच्या शासनात महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता आहे. अली लारीजानी यांचा जन्म ३ जून १९५८ रोजी इराकच्या नजफमध्ये झाला. त्यांचे कुटुंब आधीपासूनच प्रतिष्ठित आणि श्रीमंत आहे. इराणमधील प्रभावशाली परिवारांमध्ये त्यांचा समावेश होतो. टाइम्स मासिकाने २००९ मध्ये त्यांचा उल्लेख ‘इराणचे केनडी’ असा केला होता. त्यांचे वडील मिर्झा हाशेम अमोली विख्यात विद्वान होते.

लारीजानी यांच्या प्रमाणेच त्यांचे बंधू इराणमधील शक्तिशाली पदांवर राहिले आहेत. यामध्ये न्यायपालिका आणि तज्ज्ञांच्या समितीचा समावेश आहे. या समितीला सर्वोच्च नेता निवडण्याचा अधिकार आहे. लारीजानी यांनी २० व्या वर्षी फरीदेह मोताहारी यांच्याशी विवाह केला. त्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे संस्थापक रुहोल्लाह खोमेनी यांचे विश्वासू मोर्तेजा मोताहारी यांच्या कन्या आहेत. अली लारीजानी इस्लामिक क्रांतिकारी गार्ड कोअरचे माजी सैन्य अधिकारी आहेत. ते २०२५ पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. २००८ ते २०२० या कालावधीत इराणच्या संसदेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. लारीजानी यांनी २०२४ मध्ये राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. पण त्यांना अयोग्य ठरवण्यात आले. १५ ऑगस्ट २००५ ते २० ऑक्टोबर २००७ या कालावधीत ते सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव होते.

Comment here