महा-राष्ट्र

विद्वत्तेचा दीपस्तंभ मालवला : प्रा.डॉ.जनार्दन वाघमारे यांचे निधन

मुंबई : विद्वत्ता, तत्त्वनिष्ठा आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेले माजी खासदार व ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.जनार्दन वाघमारे यांचे निधन झाल्याची दुःखद वार्ता समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात भावना व्यक्त करत म्हटले की, प्रा.डॉ.वाघमारे यांनी शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन व प्रशासन या दोन्ही अंगांनी उल्लेखनीय ठसा उमटविला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी प्रभावी कार्य केले. लातूरचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी समर्थपणे पार पाडली. किल्लारी भूकंपशास्त्र संशोधन केंद्र तसेच नांदेड-किनवट येथील आदिवासी संशोधन व अभ्यास केंद्रांच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार मोलाचा ठरला. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी सहभाग घेतला. राज्यसभा सदस्य म्हणून विविध संसदीय समित्यांवर काम करत त्यांनी व्यापक योगदान दिले. “प्रा.डॉ.वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. ही सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वाघमारे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभो,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

Comment here