आपला जिल्हा

दहावी-बारावी खेळाडू विद्यार्थ्यांसाठी ग्रेस गुण अर्ज ऑनलाईन सुरू; ३१ मार्च अंतिम मुदत

बीड : जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील ग्रेस गुण अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे खेळाडू विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येत असून, यंदा सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच पात्र खेळाडू विद्यार्थ्यांनी https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकद्वारे सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन भरावा. कोणताही अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयात ऑफलाईन स्वीकारला जाणार नाही. ऑफलाईन अर्ज सादर केल्यास संबंधित संस्थेला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार धरण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा अर्ज प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी परीक्षा बैठक क्रमांक नमूद करताच त्यांचा फोटो प्रणालीमध्ये आपोआप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही आणि तांत्रिक चुका कमी होणार आहेत. इयत्ता दहावी व बारावी ग्रेस गुण अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.३१मार्च २०२६ आहे. त्यानंतर कोणतेही प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक व खेळाडू विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक अविनाश पाटील (संपर्क : ९६२३७८११२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी कळविले आहे.

आवश्यक कागदपत्रे :

1) परीक्षा प्रवेशपत्र 

2) प्रपत्र क्रमांक – एक

3) प्रपत्र क्रमांक – दोन

4) अधिकृत क्रीडा स्पर्धेत सहभागाचे प्रमाणपत्र

5) बारावीसाठी अर्ज करत असल्यास दहावीचे गुणपत्रक

Comment here