आपला जिल्हा

झोक्याच्या दोरीचा गळफास; ९ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

माजलगाव : शहरात घरात झोका खेळताना गळ्याला अचानक फास बसून एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माजलगाव शहरातील खंडोबा मैदान परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. वृंदा समीर रूद्रवार असे मृत मुलीचे नाव असून ती अवघी नऊ वर्षांची होती. मंगळवारी भगवान महावीर जयंतीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने वृंदा आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर झोका खेळत होती. यावेळी ती खुर्चीवर चढून झोका पकडण्याचा प्रयत्न करत असताना खुर्ची अचानक कलंडली. त्यामुळे झोक्याची दोरी तिच्या गळ्याभोवती अडकून गळफास बसला. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, वृंदा जेवणासाठी खाली का आली नाही हे पाहण्यासाठी तिची आई वर गेली असता हा प्रकार उघडकीस आला. मुलीची अवस्था पाहून आईने आक्रोश केला. आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्यही धावत आले. त्यांनी तात्काळ वृंदाला रूग्णालयात दाखल केले; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वृंदा ही ईगलवूड इंग्लिश स्कुलमध्ये दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या आकस्मिक निधनामुळे रूद्रवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रूद्रवार परिवारावर कोसळलेल्या दुःखात वर्तमान माध्यम समूह सहभागी आहे.

Comment here