आपला जिल्हा

वडवणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान २.०’चा आढावा

विकासकामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

बीड : आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘संपूर्णता अभियान २.०’चा सखोल आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान उपस्थित होते. दरम्यान, वडवणी तालुक्यातील विविध विकासकामांचा सद्यस्थिती अहवाल बैठकीत सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करून पुढील उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी आणि पायाभूत सुविधा या प्रमुख क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेताना संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विशेषतः शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षण क्षेत्रात मुलींच्या सुरक्षिततेवर भर देत शाळांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे तसेच सर्व शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

कृषी क्षेत्रात रेशीम शेती व मनरेगा यांचा समन्वय साधून उत्पादनवाढीस चालना देण्यावर भर देण्यात आला. बचत गटांच्या माध्यमातून शाश्वत व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन देण्याबरोबरच ‘सौर ग्राम’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र (कुप्पा) व ग्रामीण रूग्णालय (वडवणी) येथील प्रलंबित कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

तसेच आगामी प्रकल्पांमध्ये ‘बचत भवन’, ‘उमेद मार्ट’, उसतोड कामगारांच्या मुलांसाठी निवासी वसतिगृह, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा मॉडेल शाळा म्हणून विकास, नवीन अंगणवाडी केंद्रे व आयटीआय इमारत उभारणी यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासोबतच प्रधानमंत्री कुसुम, मनरेगा आणि प्रधानमंत्री घरकुल योजना यांसारख्या योजनांअंतर्गत विकासकामांना गती देण्यावर भर देण्यात आला. वडवणी तालुक्याचा आदर्श तालुका म्हणून विकास करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Comment here