लिंगायत बिझनेस नेटवर्क ग्रुप, पुणे यांच्या पुढाकाराने आयोजित या एक्स्पोमध्ये विविध व्यवसाय, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि सेवा क्षेत्रातील १२० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. विशेषतः तरूणाईने या स्टॉल्सना मोठ्या प्रमाणावर भेट देत नवीन व्यवसाय कल्पना, स्टार्टअप संधी आणि करिअर मार्गदर्शनाची माहिती घेतली. या एक्स्पोच्या माध्यमातून उद्योजक, डॉक्टर, अभियंते, चार्टर्ड अकाउंटंट, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि नेटवर्किंग करण्याची संधी मिळाली. अनुभवी उद्योजकांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन करत व्यवसायवृद्धीच्या संधींबाबत माहिती दिली. सायंकाळी आयोजित पारितोषिक व कौतुक समारंभात समाजातील यशस्वी व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमामुळे समाजातील उद्योजकतेला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. एकूणच, ‘एलबीएन एक्स्पो २०२६’ हे उद्योजक, व्यापारी आणि युवकांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरले. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत समाजातील एकजूट आणि प्रगतीसाठी अशा संघटनांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा एक्स्पो यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशन व लिंगायत बिझनेस नेटवर्क या संस्थांच्या टीमने परिश्रम घेतले.




वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटचे लोकार्पण
पुण्यात वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्या www.vlgo.org या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील जनसेवा सहकारी बँक पुणे अध्यक्ष तथा सीओईपीज् भाऊ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष राजेंद्र गुरुपादय्या हिरेमठ आणि पुणे येथील दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष अनिल भरतशेठ गाडवे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुणे येथील टूलकॉन सिस्टीमचे संचालक, सुप्रसिद्ध उद्योजक अजय गंगाधरराव मुंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिग्गज उद्योजकांची हजेरी
वीरशैव लिंगायत ग्लोबल ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित पारितोषिक वितरण व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणी फोर्जच्या एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन रोहिणी गौरीशंकर कल्याणी या होत्या. तसेच सुप्रसिद्ध उद्योजक रवि चंद्रशेखर डोल्ली आणि एनसीसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश मुद्दा यांचीही उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, यश, प्रेरणा आणि भविष्याच्या संधींचा संगम एकत्रित आल्याने त्यांच्या मनोगत ऐकण्याचा लाभ उपस्थितांना लाभला. या सुवर्णसंधीमुळे प्रत्येकाला नवचैतन्य, नवी दिशा आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
उत्कृष्ट उद्योजकांचा गौरव
विशेष सन्मानार्थी म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व सिनेकलाकार शिवराज दत्तात्रय वायचळ यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या “आता थांबायच नाय!” या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. तसेच पिंपरी-चिंचवड येथील मराठवाडा युवा मंचचे अध्यक्ष सत्यजीत राजशेखर चौधरी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची अधिकृत मान्यताप्राप्त ट्रॅव्हल कंपनी ‘रॉयल टुरिझम’च्या संस्थापक व संचालिका राजश्री खडके-देशमाने यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सोहळ्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा गौरव केवळ व्यक्तिगत मर्यादित नसून, संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा उत्सव असल्याची भावना गौरवार्थींनी मनोगत व्यक्त करताना अधोरेखित केल्या. त्यांच्या या भावना समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या.
{सर्व छायाचित्रे साभार : अमर देवणे}



Comment here