विशेष वार्ता

नित्रुड ग्रामपंचायतीवर २५ वर्षे लालबावटा; काॅ. दत्ता डाके यांचा आजही ‘करिश्मा’ कायम

बाबा श्रीहरी देशमाने

माजलगाव : तालुक्यातील नित्रुड ग्रामपंचायतीवर मागील ५ वर्षे अपवाद वगळता २५ वर्षे लालबावट्याची सत्ता असून ‘माकप’चे ज्येष्ठ नेते काॅ.दत्ता डाके यांचा आजही ‘करिश्मा’ कायम आहे. त्यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा सरपंचपदाची माळ पडली आहे, हा डाव्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया ‘वर्तमान’शी बोलताना डाके यांनी दिली.

सन १९८० पासून काॅ.दत्ता डाके अगदी विद्यार्थी दशेपासून डाव्या विचारसरणीशी जोडलेले आहेत. बीड जिल्ह्याचे माजी खासदार काॅ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या विचाराने प्रभावित होऊन अॅड.मोतीराम दराडे यांच्या नेतृत्वाखाली काॅ.दत्ता डाके मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात आले ते आजतागायत खांद्यावर लालबावटा घेऊन कार्यरत आहेत. सलग २५ वर्षे ग्रामपंचायतीवर लालबावट्याची सत्ता प्रस्थापित करणारे काॅ.डाके आजही तितकेच लोकप्रिय आहेत. १९९५ ते २००५ या कालावधीत ते सरपंच राहिले. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पॅनल निवडून आणून ते तिसऱ्यांदा नित्रुडचे सरपंचपद भूषवित आहेत. ११ वर्षे नित्रुड सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणूनही त्यांची प्रभावी कारकीर्द राहिलेली आहे.

विधानसभाही लढविली

काॅ.दत्ता डाके मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते असून माजलगाव विधानसभा मतदारसंघात त्यांची चांगली पकड आहे. त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि थेट विधानसभा निवडणुकही लढविली आहे. सध्याचे राजकारण भांडवली असून तत्त्वांचे राजकारण दुरापास्त झाले आहे. अशा काळात जगाला मानवतावाद शिकवणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच तारू शकतो, असे काॅ.दत्ता डाके सांगतात.

Bhagirath Todkari Administrator
Sorry! The Author has not filled his profile.
×
Bhagirath Todkari Administrator
Sorry! The Author has not filled his profile.
Latest Posts

Comment here