सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा सल्ला
पणजी : युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायद्यावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी शनिवारी गोव्यात लागू असलेल्या या कायद्याचे कौतुक केले आहे. हा कायदा कसा काम करतोय हे बुद्धीवाद्यांनी इकडे येऊन पहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. ज्या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी हे विधान केले त्या कार्यक्रमात न्यायमूर्ती एन.व्ही.रमना आणि केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह इतर लोक उपस्थित होते.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गोव्यात मुंबई हायकोर्टाच्या एका इमारतीचे उद्घाटन करताना सरन्यायाधीश म्हणाले, गोव्यात तोच समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार मला न्याय देण्याचे भाग्य लाभले. हा कायदा विवाह आणि वारसदारासाठी लागू होतो. धार्मिक बंधने असतानाही हा कायदा गोव्यात वापरला जात आहे. मी समान नागरी कायद्याबाबत बरीच संस्थात्मक चर्चा ऐकल्या आहेत. मी त्या सर्व बुद्धीवाद्यांना आवाहन करतो की, त्यांनी इकडे यावे आणि न्यायाची व्यवस्था जाणून घ्यावी, की हे काय असते. असेही ते म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एन.व्ही.रमना म्हणाले, न्यायव्यवस्थेच्या गरजा भागवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना एकत्रितपणे राष्ट्रीय न्यायिक आधारभूत महामंडळ स्थापन करावे. आधुनिकीकरणाच्या मार्गात येणाऱ्या अडचणींबाबत बोलायचे झाल्यास प्रगतीच्या मार्गात पैशाची कमी येता कामा नये, असेही ते पुढे म्हणाले.
Comment here