किट्टीआडगाव येथे घडली दुर्देवी घटना
माजलगाव : तालुक्यातील किट्टीआडगाव येथे रविवारी सकाळी घरात विद्युत प्रवाह उतरल्याने मायलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. शशिकलाबाई शंकरराव फपाळ (वय 65) आणि सखुबाई फपाळ (वय 45) असे मृत मायलेकीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किट्टीआडगाव येथील पाटील गल्ली येथे शशिकलाबाई शंकरराव फपाळ या मुलगी सखुबाई सोबत राहत. रविवारी सकाळी ६ वाजता झोपेतून उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागला असता त्यांना तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. यावेळी मुलगी सखुबाई आईला काय झाले हे पाहण्यासाठी गेली असता तिला देखील तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. यात दोघी मायलेकी हिरपळून जागीच ठार झाल्या. दरम्यान, पाटील गल्ली येथे मागील दहा दिवसांपासून अनेक घरात विद्युत प्रवाह उतरला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी महावितरणकडे केल्या होत्या. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता दुर्लक्ष केले. यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Comment here