माजलगाव : जेष्ठ पत्रकार बाबा देशमाने आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ देशमाने यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. पारंपरिक परंपरेला फाटा देत आपल्या आईंच्या स्मृती कायम स्मरणात राहण्यासाठी शेतातच रक्षा विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण केले. दरम्यान, देशमाने बंधूंच्या या सुधारणावादी निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे.
मौजे चाटगाव (ता.किल्लेधारूर, जि.बीड) येथील रहिवाशी जेष्ठ पत्रकार बाबा देशमाने आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ देशमाने यांच्या मातोश्री दिवंगत लक्ष्मीबाई श्रीहरी देशमाने यांचे रविवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर चाटगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. देशमाने परिवाराने पारंपरिक पद्धतीला फाटा देत दिवंगत लक्ष्मीबाई देशमाने यांच्या अस्थी, रक्षा विसर्जन शेतातच करून त्यावर वृक्षारोपण केले आहे. हा आदर्श निर्णय घेण्यासाठी परिवारातील श्रीहरी देशमाने, सखाराम देशमाने, मंगल देशमाने, छाया देशमाने, शिल्पा देशमाने, सचिन देशमाने, सूरज देशमाने यांनी पुढाकार घेतला. देशमाने परिवाराने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मान्यवरांकडून आदर्श निर्णयाचे स्वागत
देशमाने परिवाराने पारंपरिक पद्धतीला फाटा देत दिवंगत लक्ष्मीबाई देशमाने यांच्या अस्थी, रक्षा विसर्जन शेतातच करून त्यावर वृक्षारोपण केले आहे. हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश असून हा आदर्श इतरांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी कॉ.नामदेवराव चव्हाण यांनी व्यक्त केले. मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, प्रा. सुशिलाताई मोराळे, कॉंग्रेस नेते दादासाहेब मुंडे, दत्ता कांबळे, पुण्यातील युवा उद्योजक गोविंद केकान, जेष्ठ पत्रकार तुकाराम येवले, बंडू खांडेकर, संतोष स्वामी, सरपंच महादेव केकान, माजी सरपंच बालासाहेब केकान, पोलिस पाटील विठ्ठल केकान, सामाजिक कार्यकर्ते संपत वावळकर, सखाराम वावळकर, विकी गवळी, राम बीडकर, राहुल खुणे, निवृत्ती प्रधान, वाल्मिक वावळकर आदी मान्यवरांनी देशमाने परिवाराच्या सुधारणावादी निर्णयाचे स्वागत केले आहे.
वाढते प्रदूषण रोखण्याची गांभीर्याने विचार करण्याची गरज : बाबा देशमाने
नदी, ओढे अंत्यविधीनंतर टाकलेल्या अस्थी, रक्षा विसर्जनामुळे प्रदूषित होत आहेत. परिणामी त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शासन या बाबतीत व्यापक स्वरूपात जनजागृती करत आहे. असे असले तरी हे प्रयत्न तोडके पडत आहेत, या सर्व परिस्थितीचा विचार करून आणि आईंच्या स्मृती कायम स्मरणात ठेवण्यासाठी शेतातच रक्षा विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण केले, पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया दिवंगत लक्ष्मीबाई यांचे जेष्ठ पुत्र बाबा देशमाने यांनी दिली.
Comment here