आपला जिल्हा

‘स्वत धान्यातील गैरव्यवहार खपवून घेणार नाही’

आमदार प्रकाश सोळंकेंनी अधिकारी, कर्मचारी धरले धारेवर; कोरोनाबाबत घेतला आढावा

माजलगाव : स्वस्त धान्य वाटपातील गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना करा, अशा स्पष्ट सूचना आढावा बैठकीत आमदार प्रकाश सोळंके यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. दरम्यान, कोरोना बाबतही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करू नये, याबाबतही संबंधितांना आमदार सोळंके यांनी धारेवर धरले.

येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीला आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग सोळंके, समाजकल्याण सभापती कल्याण आबूज, पं.स.सभापती भागवतराव खुळे, उपसभापती डाॅ.वसिम मनसबदार, पं.स.सदस्य शशांक सोळंके, जयदत्त नरवडे, नगरसेवक भागवतराव भोसले, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुरेश साबळे, तालुका अधिकारी डाॅ.मधुकर घुबडे, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने आणि कर्मचारी आदी उपस्थित होते. आमदार सोळंके म्हणाले, कोरोना काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रूग्णांच्या हितासाठी प्रयत्न करावेत. शासकीय रूग्णालयातील उपचार पध्दती आणि सेवा याचे कौतुक करतानाच खाजगी रूग्णालयांनी कोविड बाबत दर्जेदार सेवा पुरविण्याची गरज आहे. काही खाजगी रूग्णालये भरमसाठ बिले आकारत असल्याचेही निदर्शनास आल्याचे सोळंके म्हणाले. खाजगी रूग्णालयातील बीलांचे ऑडीट होणे गरजेचे आहे. याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले. संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेंतर्गत मिळणारे मानधन वेळेवर लाभार्थींना मिळत नाही. काही ठिकाणी बँकेत रक्कम वर्ग झाल्यानंतर बँक कर्मचारी उदासीनपणा दाखवून अडथळा आणत आहेत, याबाबतही संबंधितांना धारेवर धरत या योजनेमध्ये सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचे सोळंके म्हणाले.


…तर दोषींवर कडक कारवाई करणार

स्वस्त धान्य दुकानदारांनी आपापल्या गावांत ग्राम दक्षता समितीसमोर स्वस्त धान्य वाटप करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविणे अनिवार्य आहे, याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अक्षरशः झापले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वस्त धान्य वाटपात कुचराई केली तर दोषींवर कडक कारवाई करू असेही निर्देश आमदार प्रकाश सोळंके यांनी दिले.

Comment here