मंत्री शंभूराज देसाई यांची पंकजा मुंडेंना प्रवेशाबाबत ऑफर
बीड : ताई शिवसेनेत या, योग्य सन्मान देऊ अशी प्रवेशाबाबत खुली ऑफर शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना दिली आहे. दरम्यान, देसाई यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
भाजप खासदार डाॅ.प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच, आता शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तसेच पंकजा मुंडे यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले आहे. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडेंवर बोलताना म्हणाले की, भाजप नेत्या पंकजा मुंडे या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. त्यांचा योग्य तो मानसन्मान दिला जाईल, पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. तसेच त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल, असे शंभुराज देसाई म्हणाले.
पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
गेल्या काही दिवसांपासून मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात वरळीत झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून भाजप नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे सूचक इशारा सुद्धा दिला आहे. त्यामुळे त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडे यांना प्रवेशाबाबत खुली ऑफर दिली असली तरी याबाबत पंकजा मुंडे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
Comment here