आपला जिल्हा

माजलगाव धरण १०० टक्के भरले

११ दरवाजे खुले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

माजलगाव : जोरदार पाऊसामुळे माजलगाव धरण शंभर टक्के भरले असून तब्बल ११ दरवाजे दीड मिटरने खुले करण्यात आले आहे. सिंदफणा नदी पात्रात ६२ हजार ५१७ क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, सिंदफणा नदीपात्रालगत असलेल्या सर्व गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

माजलगाव धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने धरण १०० टक्के भरले आहे. पाण्याची आवक वाढत असल्याने धरणाचे सोमवारी पहाटे ६ वाजता अकरा दरवाजे दीड मिटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून सिंदफणा नदी पात्रात ६२ हजार क्युसेस एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. माजलगाव धरणाची यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासुनच पाणी पातळी वाढत होती. ऑगस्ट महिन्यात १५-२० दिवस पाऊस नसल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली नव्हती. मात्र, मागील दोन दिवसांपासून धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली. हे धरण सोमवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरले. यानंतरही धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे प्रशासनाने धरणातुन पाणी सोडण्याचा निर्णय पहाटे घेतला आहे. धरणाची पाणी पातळी ४३१.८० मीटर एवढी आहे .शनिवारी, रविवारी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरण शंभर टक्के भरले. यामुळे धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणात सध्या ६२ हजार ५१७ क्युसेस पाण्याची आवक आहे. तेवढ्याच क्षमतेने पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे, अशी माहिती धरणाचे अभियंता बी.आर.शेख यांनी दिली. ११ दरवाजे खुले करण्यात आले असल्याने सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामुळे सिंदफणा नदीपात्रालगत गावांतील ग्रामस्थांनी या बाबत सावध रहावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comment here