विशेष संपादकीय
महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालता आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला आहे. हिरवीगार पीके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. परिस्थिती हाताळताना शासन-प्रशासनाची दमछाक होताना दिसत आहे. मराठवाड्यातील मोठे असलेल्या जायकवाडी धरण ९२ टक्के भरले आहे. धरणाच्या चार दरवाज्यातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी पाठोपाठ माजलगाव धरण ९८ टक्के भरले आहे. या धरणाचे ११ दरवाजे उघडले असून त्यातून २७ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सोमवारपासून सिंदफणा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाणी जात असल्याने माजलगावकरांनी स्थानिक पर्यटन म्हणून पुलाकडे गर्दी करायला सुरूवात केली आहे. हा धोकादायक पूल गेल्या दीड वर्षापासून वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे कठडे तुटून गेलेली आहेत. प्रशासनाने हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट नमूद केलेले असतानाही माजलगावकर मात्र सेल्फी पाँईट करून आपले जीवन धोक्यात घालत आहेत. स्थानिक पोलिस प्रशासनाला न जुमानता अतिउत्साही माजलगावकर स्मार्ट फोन घेवून सेल्फी काढण्यात दंग झालेले आहेत. मराठवाड्यात सोमवारी एकाच दिवशी डझनभर जणांचा मृत्यू पाण्यात वाहून गेल्याने झाला आहे. याची भनक या माजलगावकरांना का लागली नाही? हा खरा सवाल आहे. शेवटी अतिउत्साही माजलगावकरांना कुणी आवरा रे, असे म्हणावेसे वाटते.
: बाबा श्रीहरी देशमाने
Comment here