सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाताई पुंडगे यांचे परखड विचार
दिंद्रुड : पुस्तक वाचल्याने मस्तक जागेवर राहते. मस्तक जागेवर राहिल्यास कुणाचे हस्तक होण्याची गरज नाही. स्वाभिमानाने जगायचे असल्यास महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेवू नका तर डोक्यात घ्या, असे परखड विचार दिंद्रुडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाताई पुंडगे यांनी चाटगाव येथे मांडले.
धारूर तालुक्यातील चाटगाव येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक तथा युवा नेते गोविंद महादेवराव केकान हे होते. तर जयंती सोहळ्याचे उद्घाटक म्हणून दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाताई पुंडगे यांची उपस्थिती होती. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विश्व मानवाधिकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अजिम शेख, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे मराठवाडा संयोजक तथा ज्येष्ठ पत्रकार बंडू खांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल डोंगरे, भीमआर्मीचे बीड जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ मायंदळे, भाजपा नेते तथा चाटगावचे उपसरपंच बालासाहेब केकान, संपादक बाबा श्रीहरी देशमाने, माजी उपसरपंच महादेव केकान, सरपंच रामभाऊ गडसिंग, पोलीस पाटील विठ्ठल केकान, माजी सैनिक अर्जून केकान, राष्ट्रवादीचे युवा नेते गोविंद पांडुरंग केकान, पत्रकार संतोष स्वामी, संजय केकान, बाबासाहेब केकान आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रभाताई पुंडगे म्हणाल्या, बहुजनांची शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षण आपल्या मुलांना द्या, असे आवाहन त्यांनी केले. जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष दीपक गडसिंग, आयोजक दादासाहेब साबळे, सतिश देशमाने आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सांगळे, प्रविण आवटे तर आभार कृष्णा केकान यांनी मानले. सायंकाळी महात्मा फुले आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यात उद्योजक सोमनाथ चांदमारे, पत्रकार धैर्यशील ढगे, प्रदिप ढगे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे, बसपाचे प्रदेश सचिव सिध्दार्थ टाकणखार, अरविंद लोंढे, युवा नेते बाळासाहेब सांगळे आदींनी सहभाग घेतला.
हिंदूंनी बाबासाहेबांचे उपकार कदापीही विसरू नये : गोविंद केकान
अध्यक्षीय समारोपात गोविंद महादेवराव केकान म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एका गटासाठी किंवा समुहासाठी काम केले नाही. ते व्यापक दूरदृष्टी असलेले महान नेते होते. हिंदूकोड बिलाच्या माध्यमातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूंना हक्क, अधिकार प्रदान केले. त्यामुळे हिंदूंनी बाबासाहेबांचे उपकार कदापीही विसरू नये, असे आवाहन केकान यांनी केले. गावाच्या विकासासाठी जे शक्य आहे, ते करण्यास आपण कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केकान यांनी दिली.
बाबासाहेबांचा विचार बहुजनांना तारणारा : बंडू खांडेकर
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना बंडू खांडेकर म्हणाले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग समस्त बहुजनांचे कल्याण करणारा आहे. त्यामुळे बहुजन समाजाने बाबासाहेबांनी सांगितलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र जपावा. याप्रसंगी अनिल डोंगरे, सिद्धार्थ मायंदळे, अजिम शेख, बाबा श्रीहरी देशमाने, संतोष स्वामी आदींनी आपले विचार मांडले.
Comment here