महा-राष्ट्र

अंतरवालीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सभास्थानामुळे नुकसान झालेल्या ४४१ शेतकऱ्यांना ३२ लाखांची भरपाई; जालन्यातील शेतकऱ्यांना ”लोकनाथा”चा प्रत्यय

जालना : अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेवेळी लाखोंची गर्दी जमली होती. यावेळी अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या ४४१ बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ३२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक स्थितीत पोहोचले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर आणि सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले असून सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने ठोस कालबद्धपद्धतीने आरक्षण देण्याची घोषणा केल्याने मराठा समाजाकडून समाधान व्यक्त केले जात असतानाच जालन्यातील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

कारण एखाद्या आपत्तीत झालेल्या नुकसानीनंतर शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. एखाद्या सभेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा प्रघात नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा उभारण्यात आलेला प्रामाणिक लढा आणि त्यात समाजबांधवांनी घेतलेला उत्स्फुर्त सहभाग लक्षात घेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेत जमीनीचे सभास्थान म्हणून वापरल्याने झालेल्या नुकसानासाठी संबंधित ४४१ शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचे शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांवरील उपचारासाठीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २५ लाखांहून अधिक रुपयांचे अर्थसहाय्य केले होते.

Comment here