आपला जिल्हा

भाजपाला मतदान तर देश कंगाल

राष्ट्रवादीचे नेते प्रा.ईश्वर मुंडे यांचा माजलगावात घणाघात

माजलगाव : आता देशात लोकसभा निवडणूकीचे बिगूल केंव्हा ही वाजू शकते. प्रत्येक पक्ष त्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत. इंडीया आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आपला उमेदवार देणार आहे.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला मतदान करू नये नाही तर महाराष्ट्रासह भारत देश आर्थिक दृष्ट्या कंगाल होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार तथा राज्य प्रमुख, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांनी माजलगाव येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुढे बोलताना प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केलेली नसलेल्यामुळे जनतेत तीव्र नाराजी आहे. मोदींची विकासाची गॅरंटी नसून भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करण्याची गॅरंटी आहे. महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव नाहीत,शेतकरी विरोधी कायदे या मुळे असंतोष निर्माण झालेला आहे, शासकीय कंपन्यांचे खाजगीकरण, शासकीय नौकऱ्यांचे कंत्राटीकरण करून खाजगी कंपन्यांच्या हातात देश दिला जात आहे.

शेतकरी व शेती उद्योग वाऱ्यावर सोडून बड्या उद्योगपतींचे लाखो करोडोंचे कर्ज माफ केल्या जात आहे. त्या बदल्यात कंपन्यांकडून भाजप ला देणग्या व निवडणूक निधी मिळवला जात आहे या मुळे भारत देश दिवाखोरीत जाईल. महाराष्ट्रातील उद्योगांचे गुजरातला अपहरण होत आहे यामुळे महाराष्ट्र कंगाल होईल. बीड जिल्ह्यात केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाचा एक ही प्रकल्प उभा केलेला नाही. बीड जिल्ह्यातील ऊस तोड मजूरांना मजूरी वाढून देण्या पेक्षा त्यांच्या हातातील कोयता कायम स्वरूपी सुटला पाहीजे,त्यांच्या मुलांचे चांगले शिक्षण झाले पाहीजे. यासाठी बीड जिल्ह्यात नवीन उद्योग उभारणे, सिंचन प्रकल्प तलाव, शेती मालावर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारणे, शेती आवजारे, सिंचन आवजारे तात्काळ अनुदानावर वाटप करणे आवश्यक आहे. बीड-परळी रेल्वे जलद गतीने पुर्ण होऊन घाटनांदूर ते अहमदनगर व सोलापूर ते जळगांव हे रेल्वे मार्ग तयार होऊन बीड जिल्ह्यात नवीन विमान तळ होणे आवश्यक आहे. आपणास पक्षाने व जिल्ह्यातील मतदारांनी संधी दिली तर आपण या गोष्टी प्राधान्याने पूर्ण करून घेऊ असे मत बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार प्रा.ईश्वर आनंदराव मुंडे यांनी व्यक्त केले. या वेळी जेष्ठ नेते दयानंद स्वामी, कचरू खळगे, मनोज फरके, शिवसेनेचे रामराजे सोळंके, राष्ट्रीय काँग्रेसचे नारायण होके, धारूर तालुकाध्यक्ष युवराज लगड, सिताराम क्षीरसागर, शेख बाबा, प्रशांत बडे, महादेव देवकर यांचे सह पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Comment here