पिकांचे प्रचंड नुकसान, गावाचा संपर्क तुटला, शाळेला सुट्टी; ग्रामस्थांची परेशानी
माजलगाव : तालुक्यातील घळाटवाडी येथील घळाटी नदीला शुक्रवारी रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे मोठा पुर आला आणि नदीकाठच्या घळाटवाडी, पवारवाडी, शिंपेटाकळी गावातील अनेक शेतक-यांच्या उभ्यास सोयाबीन, कापुस या पिकांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने गावाचा संपर्क तुटला तर शिक्षकांना शाळेत येता न आल्याने शनिवारी दिवसभर शाळा बंद होती तर ग्रामस्थांसह माजलगावला येणारे अनेकजण अडकुन पडले होते.
माजलगाव तालुक्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे माजलगाव तालुक्यातील घळाटवाडीच्या नदीलापूर आला या पुराचे पाणी घळाटवाडी, पवारवाडी, शिंपेटाकळी गावांच्या शेतशिवारात पाणी घुसले आहे. ढगफुटी सदृश पावसामुळे घळाटवाडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीचे पाणी शेतशिवारात शिरले असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.अनेक छोट्या-मोठ्या नाल्यांना ही पूर आला असून यामुळे पिकासह शेती खरडुन गेली आहे तर कापूस, सोयाबीन पिकावर पंधरा फुटापर्यंत पाणी वाहत आहे. या पुरामुळे दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सदरील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असी मागणी संबंधित शेतकर्यांतुन होत आहे. दरम्यान नदीने शनिवारी सकाळी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे दिवसभरात घळाटवाडी गावाचा संपर्क तुटला होता तर गावातुन माजलगावी येणा-या अनेकांना ताटकळत बसावे लागले. घळाटी नदीचा पुल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नेहमीच पाणी येते. परिणामी शिक्षकांना शाळेत येता येत नाही. गावामध्ये पहिली ते आठवी पर्यंत शाळा असून विद्यार्थी संख्या देखिल चांगली आहे. केवळ पुला अभावी शाळेला पावसाळ्यात सारखीच सुट्टी द्यावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शासनाने तात्काळ याठिकाणी मोठ्या उंचीचा पूल उभारण्याची गरज आहे.
Comment here