माजलगाव : येथील प्रसिद्ध श्री सद्गुरू मिस्किन स्वामी मठ संस्थान नेहमीच सामाजिक सलोख्याला प्राधान्यक्रम देत आहे. सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी यांच्या संजीवन समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त सर्वधर्मीय रक्तदात्यांनी सहभाग घेऊन सामाजिक सलोख्याचा आदर्श पायंडा पाडला आहे. धर्माच्या पलीकडे माणुसकीचे दर्शन घडविले, याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी सामाजिक सलोखा जपण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.
माजलगावातील सद्गुरू श्री मिस्किन स्वामी मठ संस्थानमध्ये वर्षभर आयोजित होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये आता आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्याचा निर्णय मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी घेतला. रविवार, दि.२७ एप्रिल रोजी माजलगाव मठात श्री सद्गुरू मिस्किन स्वामी यांच्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी हा संकल्प केला. यामुळे माजलगाव मठामध्ये आता धार्मिक कार्यक्रमातून मनाचे आरोग्य जपतानाच भाविकांच्या, शिष्यांच्या शरिराच्या आरोग्याची माहिती होण्यासाठी प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात आरेाग्य तपासणी केली जाणार आहे.
वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या माजलगाव येथील सद्गुरू मिस्किन स्वामी मठ संस्थानमध्ये श्री सद्गुरु मिस्किन स्वामी यांचा जयंती रविवारी विविध धर्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता रजत पालखी सोहळा काढण्यात आला. यामध्ये श्री मिस्किन स्वामी यांची चांदीची मूर्ती पालखीमध्ये ठेवून रजत पालखी मठ, देवी मंदिर ते सिंदफणा नदीपर्यंत काढण्यात आली. नदीपात्रात श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत चांदीच्या मुर्तीला जलाभिषेक घालण्यात आला. पालखीत सहभागी महिलांनी नदीतील जल कलशात घेऊन रजत पालखी नदीपात्र ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, हनुमान मंदिर मार्गे माजलगावकर मठात रजत पालखीचा समारोप झाला. यानंतर नदीपात्रातील जलाने श्री सद्गुरू मिस्किन स्वामी यांच्या समाधीस लघुरुद्राभिषक घालण्यात आला. यानंतर श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे आशीवर्चन लाभले. श्री सद्गुरू मिस्किन स्वामी यांच्या जन्मोत्सवानिमित्त यंदा माजलगावकर मठात रक्तदान व नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. शेवटी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमास माजलगावसह बीड, गेवराई, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री सद्गुरू मिस्किन स्वामी जयंती उत्सवासाठी माजलगाव येथील वीरशैव समाज तसेच युवकांनी मोठे परिश्रम घेतले.
४९ जणांचे रक्तदान तर १४० जणांची नेत्र तपासणी
धार्मिक कार्यक्रमातून मनाचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने यंदा श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून जयंती उत्सवानिमित्त माजलगावकर मठात प्रथमच रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी करण्यात आली. माजलगाव मठ संस्थान आणि माजलगाव ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित रक्तदान शिबिरात ४९ जणांनी रक्तदान केले तर आनंदऋषी हॉस्पिटल आणि मठाच्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराचा १४० जणांनी लाभ घेतला. यातील ५० नागरिकांमध्ये डोळ्यांचे दोष आढळून आले. त्यांच्यावर आठ दिवसात आनंदऋषी हॉस्पिटल अहिल्यानगर येथे मोफत ऑपरेशन व उपचार केले जाणार आहेत.
‘मठातर्फे वर्षभर आरोग्य शिबिरे घेणार’
आरोग्य हा विषय समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. माजलगाव मठातर्फे भविष्यकाळात आरोग्य विषयक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल. वर्षभर आरोग्य शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर असे लोकोपयोगी उपक्रम राबविण्यावर मठाचा भर असेल, अशी माहिती मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली.
Comment here