आपला जिल्हा

पहलगाम दहशतवादी हल्ला मानवतावाद विरोधीच

युवा नेते तौफीक पटेल यांची प्रतिक्रिया

माजलगाव : पहलगाम, जम्मू-काश्मिर येथे भारतीय पर्यटकांवर झालेला हल्ला हा मानवतावाद विरोधी हल्ला आहे. दहशतवाद हा दहशतवादच असतो. त्याचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. दरम्यान, अशा वातावरणात तमाम भारतीयांनी आपला सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा, असे आवाहन युवा नेते तथा माजलगाव नगर परिषदेचे माजी सभापती तौफीक पटेल यांनी केले आहे.

पहलगाम येथील झालेल्या हल्ल्याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर या नापाक हल्ल्याची जोरदार टीका होत आहे. हा हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचे बळी गेले आहेत. या हल्ल्याबाबत संशयाची सुई पाकिस्तानकडे व्यक्त केली जात आहे. भारत सरकार त्या दिशेने कठोर पाऊले उचलत आहे. याचा भारतीयांना ठाम विश्वास आहे. दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला हा कोणत्याच धर्मावर नसून तो मानवतावाद विरोधी आहे, तो भारतीयांवरचा हल्ला आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी एका दिलाने दहशतवाद मुळापासून उखडून फेकण्यासाठी एकसंघ राहण्याची गरज आहे. दहशतवाद्यांना कोणती जात नसते, धर्म नसतो. ते केवळ दहशतवादीच असतात. ज्यांना शांतता, सामाजिक सलोखा अबाधित ठेवायचा असतो. ही शांतता आणि सामाजिक सलोखा उध्वस्त करण्याचे काम दहशतवादी जम्मू-काश्मिरमध्ये करत आहेत. त्यामुळे या हल्ल्याकडे मानवतावाद विरोधी हल्ला असेच पाहिले पाहिजेत जम्मू-काश्मिर खोऱ्यातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची खरी गरज आहे. दहशतवाद संपविण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. सरकारच्या धोरणाला सर्व पक्षांनी जो पाठिंबा दर्शविला आहे, ही बाब विचारात घेण्याजोगी आहे, असेही तौफीक पटेल म्हणाले.

पर्यटनाचा स्वर्ग आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर

जम्मू-काश्मिरला पर्यटनाचा स्वर्ग म्हटले जाते. येथील डोंगर खोरे आणि निसर्गरम्य परिसर भारतीयांना नेहमी भुरळ घालतो. अलिकडच्या काळात केंद्र सरकारने जम्मू-काश्मिर हे अधिक लोकप्रिय पर्यटन हब व्हावे या दिशेने जोरदार पाऊले उचलली. याचा सकारात्मक परिणाम म्हणून पर्यटकांनी जम्मू-काश्मिरला आपली पसंती दर्शविली. पहलगाम हा भाग पर्यटनासाठी सुरक्षित मानला जात होता. मात्र दहशतवाद्यांनी आपले कारनामे करत २८ पर्यटकांचा बळी घेतला. यात सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. यात बळी गेलेल्या पर्यटकांना तौफीक पटेल मित्र मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशीही प्रतिक्रिया तौफीक पटेल यांनी दिली. दरम्यान, पहलगाम मधील हल्ल्यामुळे येथील पर्यटनाचे तीनतेरा वाजले आहेत. स्थानिकांची रोजगाराची संधी दुरापास्त झारी आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण झाला आहे, याकडेही तौफीक पटेल यांनी लक्ष वेधले आहे.

Comment here