आपला जिल्हा

हारूण इनामदार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राजकीय गणिते बदलणार

अजित पवारांना मिळाला तगडा नेता

 

बीड : जिल्ह्याच्या राजकारणातील तळागाळापर्यंत पोहोचलेले जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूण इनामदार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे राजकीय गणिते बदलणार आहेत. केज मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढली असून संघटन व्यापक करण्यासाठी ५१ हजार सदस्य संख्या वाढवणार असल्याचे अभिवचन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इनामदार यांनी दिले. दरम्यान, केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांनीही प्रवेश घेतला.

बीड जिल्ह्यात उद्योग उभारून तरुणांच्या हाताला काम देणार आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथील कार्यक्रमात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीचे विलनिकरण करण्यात आले. यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूणभाई इनामदार यांनी आश्वासन दिले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी ५१ हजार सदस्यांची नोंदणी करणार आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील वानखेडे स्टेडियम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण इनामदार व नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत व जनविकास परिवर्तन आघाडीचे नगरसेवक आणि कार्यकर्त्याची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनविकास परिवर्तन आघाडीचे विलनीकरण करून काम करण्यांचे ठरवण्यात आले. दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी वानखेडे स्टेडियम येथे एका भव्य कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक, आमदार विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्यासह पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख, हारूण इनामदार, नगराध्यक्षा सीताताई बनसोड, जनविकास परिवर्तन आघाडीचे मार्गदर्शक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, दिलीप गुळभिले, गटनेते राजू इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, नगरसेविकासह पद्मिनी शिंदे, माजी नगराध्यक्षा छाया हजारे यांच्यासह जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्व नगरसेवक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हॉइस चेअरमन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनविकास परिवर्तन आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षमध्ये विलनीकरण करून पक्षप्रवेश केला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बोलताना म्हटले की, जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूण इनामदार यांनी केज नगर पंचायतची एक हाती सत्ता मिळवून शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला आहे. आज रोजी जन विकास परिवर्तन आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलीन झाली आहे. यापुढे केज शहरात विविध विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करणार आहे. बीड जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला कामे नाहीत फक्त बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांना ऊस तोडीचे काम करण्याशिवाय पर्याय नाही त्याकरिता जिल्ह्यामध्ये मोठमोठे उद्योग उभारणार आहे या उद्योगाच्या माध्यमातून तरुणाच्या हाताला काम देणार आहे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, यापुढे केज शहराचा विकास थांबणार नाही शहरातील विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात गती देणार आहे शहराच्या विकासासाठी कितीही निधी लागला तर निधीची कमतरता भासू देणार नाही. यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण इनामदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जनविकास परिवर्तन आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलनीकरण करत आहोत अशी घोषणा केली. पुढे बोलताना हारुण इनामदार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी बीड जिल्हासह केज मतदार संघामध्ये ५१ हजार सदस्य नोंदणी लवकरात लवकर करणार आहे.

हारूण इनामदार यांना लवकरच मोठी जबाबदारी

हारूण इनामदार यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे केज मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हारूण इनामदार यांच्याकडे पक्षश्रेष्ठी मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्ष प्रवेशावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक, नगरसेवक व ग्रामीण भागातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हॉइस चेअरमन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment here