बीड : जिल्ह्यातील माजलगाव शहर आठवडाभरात झालेल्या दुसर्या खुनामुळे अक्षरशः हादरून गेले आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसल्याने पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा सिद्ध झाला आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या पाठोपाठ हॉटेल मालकाच्या खुनामुळे माजलगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
माजलगाव शहरापासून ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्रवरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड (वय ५४) रा.मंजरथ रोड माजलगाव यांच्या रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ढाब्यावर बसलेल्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकांनी बिलाच्या कारणाने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ढाबा मालक महादेव गायकवाड व मुलगा आशुतोष महादेव गायकवाड गंभीर जखमी झाले होते. महादेव गायकवाड यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचाराठी हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे प्राणज्योत मालवली. तर मुलगा आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू असून माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगावमध्ये एका हॉटेलमध्ये देण्याच्या क्षुल्लक कारणावरून ग्राहकांकडून हॉटेल मालक महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालक महादेव गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माजलगाव मार्गावर असलेल्या नागडगाव फाटा कॉर्नरवर महादेव गायकवाड यांचा गावरान ढाबा आहे. या ढाब्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास रोहित शिवाजीराव थावरे आपल्या मित्रांसोबत आला होता. यावेळी रोहितचा हॉटेल मालक महादेव गायकवाड आणि त्यांच्या मुलासोबत बिलाच्या कारणावरून वाद झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की रोहित आणि त्याच्या मित्रांनी महादेव गायकवाड यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केले. त्याचसोबत महादेव यांच्या मुलावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये महादेव आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी महादेव यांना बीडमध्ये प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या धक्कादायक प्रकरणाने बीड जिल्हा हादरला आहे. उपचारादरम्यान मालकाचा मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलीस आरोपींना कधी पकडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘नवनीत कॉवत यांनी दबंगगिरी दाखविण्याची गरज’
बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी माजलगावातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दबंगगिरी दाखविली असली तरी माजलगावातील खुनाचे सत्र पोलिसांच्या नाकर्तेपणाचा प्रत्यय आहे. त्यामुळे नवनीत कॉवत यांनी माजलगावकडे लक्ष घालावे, अशी मागणी समस्त माजलगावकरांनी केली आहे.
Comment here