आपला जिल्हा

‘राष्ट्रवादी विरोधी’ अशोक डक यांच्यावर तात्काळ कारवाई करा

पक्ष पदाधिकारी संतापले; थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार

माजलगाव : येथील अशोक गोविंदराव डक यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम केले असल्याने त्यांचेवर कारवाई करावी तसेच पक्षाच्या नेत्याचे फोटो व पक्षाचे चिन्ह वापरण्यास मनाई करून पक्षातुन हकालपटट्टी करावी, अशी मागणी मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष व मतदारसंघातील तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अशोक डक यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या विरोधात काम केले असून आता पक्ष सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पेपरला जाहिराती देवून घड्याळाचे चिन्ह जाहिरातीत टाकले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजलगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असतांना तत्कालीन मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक होते. पदावर असतांना देखील यांनी त्यावेळेस पेपरला जाहिरात दिली नाही, स्वागताचे होर्डिंग्ज बॅनर लावले नाही. व आता सभेकडे फिरकले देखिल नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे शहरभर होर्डिंग्ज लावून व पेपरला जाहिरात देवून मी स्वतः पक्षाचा नेता असल्याचे भासवत आहे. व माझी कधी न संपणारी प्रेरणा उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत असे भासवत आहेत. यामुळे पक्षाच्या स्थानिक कार्यकत्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे अध्यक्षांनी याची दखल घेवून संबंधित व्यक्तीस पक्षाचे चिन्ह व पक्षाच्या नेत्याचे फोटो वापरण्यास मनाई करावी व पक्षातुन कायमस्वरूपी हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष जयदत्त नरवडे, माजलगावचे तालुकाध्यक्ष संभाजी शेजुळ, धारूरचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप, वडवणीचे तालुकाध्यक्ष महादेव साबळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Comment here