आता मंत्रालयाच्या वाऱ्या करण्याची गरज नाही
बीड : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाकडून पात्र व गरजू रूग्णांना मदत केली जाते. राज्यातील कोनाकोपऱ्यांतून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात असत; परंतु नागरिकांना या सेवा सहजपणे जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सदरील कक्ष १ मेपासून सुरू झाला असल्याने अनेकांना सुलभता निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षांतर्गत गंभीर आणि जीवघेण्या आजारावर उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. त्यामध्ये हृदयविकार, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, अपघातामुळे होणाऱ्या शस्त्रक्रिया, भाजलेले रूग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. तसेच इतर महागड्या उपचारासाठी निधी दिला जातो. योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, खासगी रूग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांच्याकडून प्रमाणित करणे, १ लाख ६० हजार रूपयापेक्षा कमी असलेला तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला, रूग्णाचे आधारकार्ड, बाल रुग्णांसाठी आईचे आधारकार्ड, रूग्णाचे रेशनकार्ड, संबंधित आजाराचे रिपोर्ट, अपघातग्रस्त रूग्णांसाठी एफआयआर रिपोर्ट, प्रत्यारोपण रूग्णांसाठी झेडटीसीसी किंवा शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे तसेच संबंधित रूग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षातून दिवसेंदिवस मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रूग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हास्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रूग्णांना दिलासा मिळत असल्याची माहिती, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
थेट संपर्कासाठी हेल्पलाइन
बीड येथील जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.चैतन्य कागदे असून त्यांच्या अधिपत्याखाली एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक, समन्वयक कार्यरत आहेत. वैद्यकीय मदतीचा अर्ज भरण्यासंदर्भात अडचण आल्यास ८६६८६७२२३१ या भ्रमणध्वनी क्रमांक तसेच cmrfbeed@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.
४ कोटी ८९ लाखांचा निधी वितरित
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयात १ जानेवारी ते ३० जूनदरम्यान बीड जिल्ह्यात ६१० रूग्णांना ४ कोटी ८९ लाख ६ हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे.



Comment here