आपला जिल्हा

श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अनुष्ठान

माजलगाव मठात २४ ऑगस्ट रोजी होणार सांगता

माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे विद्यमान मठाधिपती श्री.ष ब्र.१०८ श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी श्रावणमासानिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अनुष्ठान सुरू केले आहे. दरम्यान, श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे चतुर्थ अनुष्ठान आहे. दरम्यान, माजलगाव मठात रविवार, २४ ऑगस्ट रोजी सांगता होणार असून याप्रसंगी महापूजा आणि तीर्थप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

पवित्र श्रावणमासानिमित्त श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे अनुष्ठान सुरू केले आहे. अध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात श्रावणमास अनुष्ठानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवैक्य श्रीगुरू तपोरत्नं प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी समस्त जणांच्या कल्याणासाठी दिव्य अनुष्ठान व तपश्चर्या केली, देशातील १२ ज्योतिर्लिंग आणि नेपाळमधील पशुपतीनाथ, हिमालयात अनुष्ठान करून आपले वेगळे स्थान केले. याच विचाराचे संस्कार घेऊन विद्यमान मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज समर्थपणे वारसा चालवित आहेत. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्रावणमास अनुष्ठानाचे हे चतुर्थ वर्ष आहे. यावर्षी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक येथे अनुष्ठान सुरू केले आहे. अनुष्ठानाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रीपार्वतीमाता अन्नछत्र (कपिलधार)च्या वतीने अन्नदान सुरू आहे. विजयकुमार मुसळे, मल्लिकार्जुनआप्पा आगरे, महादेव स्वामी हे भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. श्रावणमास अनुष्ठानाची सांगता रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थान माजलगाव येथे होणार आहे. त्याअनुषंगाने महापूजा आणि तीर्थप्रसादाचे आयोजन केले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.

‘तपोरत्नांच्या आदर्श मूल्यांची जपवणूक करणार’

श्रावणमास अनुष्ठान ही खडतर तपश्चर्या आहे. शिवैक्य तपोरत्नं प्रभूपंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालण्याचा ध्यास घेतलेला आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील तपोरत्नांचे आदर्श मूल्य जपण्याचा सदैव प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची माहिती विद्यमान मठाधिपती श्री.ष ब्र.१०८ श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी दिली.

Comment here