आपला जिल्हा

माजलगावात पारंपारिक पध्दतीने बैलपोळ्याची मिरवणूक उत्साहात

प्रतिवर्षाप्रमाणे शेटे कुटुंबियांना मिळाला पहिला मान

माजलगाव : शहर आणि परिसरात पारंपारिक बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे शेटे कुटुंबियांना मिरवणुकीचा पहिला मान मिळाला.

पिठोरी अमावस्येच्या दिवशी शुक्रवारी बैलांचा सण पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. माजलगाव शहरात मानाच्या शेटे कुटुंबीयांच्या बैलांची प्रथम मिरवणुकीनंतर शहरात पोळ्यास प्रारंभ झाला. माजलगाव शहरात शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास झेंडा चौक भागातील मानाचे शेतकरी विश्वनाथ विठ्ठलअप्पा शेटे यांच्या बैलांची प्रथम मिरवणूक काढली. शेटे यांच्या बैलांची विधिवत पूजा करण्यात आली. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिल्यानंतर त्यांची ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. झेंडा चौकातून मस्जिद चौक, हनुमान चौक मार्गे ही मिरवणूक निघाली. चौकातील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन मिरवणुकीच्या सांगता झाली. याप्रसंगी सोमनाथ शेटे, पंचाक्षरी शेटे यांच्यासह कुटुंबीयांची उपस्थिती होती.

सण उत्सवातून कृषीसंस्कृतीचे जतन : विश्वनाथ शेटे

महाराष्ट्र कृषिप्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. कृषी संस्कृती सण उत्सवाच्या माध्यमातून जपली जाते. पोळा हा त्यातीलच महत्त्वाचा सण होय. माजलगावातील पोळ्याच्या मिरवणुकीचा मान पूर्वीपासूनच आमच्या कुटुंबियांकडे आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. यावर्षीही मिरवणुकीचा मान मिळाला, या मिरवणुकीत शेतकरी, आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते, अशी प्रतिक्रिया विश्वनाथ शेटे यांनी दिली.

Comment here