आपला जिल्हा

माजलगावच्या श्रीहरीची ‘हवाई’ झेप!

इंडिगोमध्ये एअरक्राफ्ट इंजिनियर म्हणून आहेर यांचा ठसा

माजलगाव : कोणत्याही क्षेत्रात आज माजलगावकर मागे नाहीत. थेट इंडिगो एअरलाईन्समध्ये एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनियर म्हणून श्रीहरी गोविंदराव आहेर याने उमटलेला ठसा प्रेरणादायी आहे. दरम्यान, श्रीहरीच्या हवाई झेपेबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माजलगाव शहरातील सामान्य कुटुंबातून आलेला श्रीहरी गोविंदराव आहेर या तरूणाने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विमान देखभाल अभियांत्रिकी क्षेत्रात एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनियर बनून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. श्रीहरीने असोशिएट टेक्निशियन, ज्युनियर टेक्निशियन, टेक्निशियन अशी सर्व पायरी पार करत अखेर एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनियर पदवी प्राप्त केली आहे. बुधवारी दिल्ली येथे झालेल्या पदवी वितरण समारंभ कार्यक्रमात त्याला ही पदवी मिळवून श्रीहरी आहेर या तरूणाने माजलगावचा अभिमान वाढवला आहे. या कामगिरीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आपल्या या तेजस्वी प्रवासात त्याला एअरक्राफ्ट क्षेत्रातील प्रतिष्ठित “पीयर अवॉर्ड” हा सन्मान देखील मिळाला आहे. हा पुरस्कार अत्यंत मेहनती आणि गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो. श्रीहरीने तो आपल्या परिश्रम, शिस्त आणि निष्ठेच्या बळावर मिळवला आहे. श्रीहरीचं बालपण अत्यंत सामान्य परिस्थितीत गेलं. त्याने इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण श्री सिध्देश्वर विद्यालय माजलगाव येथे केले व उर्वरित शिक्षण बंगलोर येथे केले. त्यांचे वडील वारकरी संप्रदायाशी जोडलेले असून त्यांनी भक्ती, प्रामाणिकपणा आणि संयम या संस्कारांनी कुटुंबाची जडण घडण केली. आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असतानाही श्रीहरीने हार मानली नाही; उलट प्रत्येक अडचणीला संधी मानून आपला मार्ग स्वतः घडवला.

श्रीहरीचे दोन्ही बंधू आपल्या कार्यातून समाजात प्रेरणा निर्माण करत आहेत. एक भाऊ चैतन्य माजलगाव येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असून, दुसरे भाऊ सच्चिदानंद शिवचरित्र व्याख्याते म्हणून शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात. श्रीहरीला या दोन्ही बंधूंचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभल्यानेच त्याला यशाचे शिखर गाठता आले. अशा साध्या, धार्मिक आणि संस्कारी कुटुंबात वाढलेल्या श्रीहरीने मिळवलेलं हे यश म्हणजेच “संघर्षातून अवकाशाला गवसणी” घातली आहे.

 

Comment here