धुळे-सोलापूर महामार्गावरील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, आरोपींचा शोध सुरू
बीड : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा ते पारगाव टोल नाका परिसरात गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली. एका मिनी ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक डी.डी. ०१ ए.सी. ९५४० गाडीवर ठेवलेल्या १२ बॅगा दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला फेकून लंपास केल्या. या घटनेप्रकरणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ढगारे यांच्या टीमने अवघ्या २ तासांत त्या गायब बॅगांचा शोध लावला आहे.
महामार्ग पोलीस मदत केंद्र येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रॅव्हल्स गाडी पारगाव टोलनाक्याकडून चौसाळामार्गे राजस्थानला जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गाडीवरील बॅग एक-एक करून रस्त्याच्या कडेने फेकल्या. त्यानंतर त्या बॅगा उचलून ते दुचाकीवरून पसार झाले. अचानक घडलेल्या घटनेने घाबरलेल्या ट्रॅव्हल्स चालकाने गाडी थेट पुढे काही अंतरावर थांबवली. ही माहिती मिळताच महामार्ग पोलीस मांजरसुंबा विभागाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी ढगारे व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून, दुचाकीस्वार चोरट्यांचा शोध सुरू आहे. सदरील घटने प्रकरणी पोलीस रूपाली दरेकर, पोलीस निरीक्षक चौधरी, महामार्ग प्रादेशिक विभाग संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. यांच्यासमवेत मांजरसुंबा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलिस अंमलदार आवेश शेख, सुरज मुंडे, बालाजी बाष्ठेवाड, तात्या बांगर, सुनिल बांगर, नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे , सानप, घुले यांची उपस्थिती होती.



Comment here