आपला जिल्हा

माजलगावात श्री श्री १००८ महामंडलेश्वर माँ कनकेश्वरी देवींची शिवमहापुराण कथा

माजलगाव : श्री श्री १००८ महामंडलेश्वर परमपूज्य माँ कनकेश्वरी देवी यांच्या सुमधूर सुरात शिवमहापुराण कथेस येथे सोमवारी प्रारंभ होत असून, त्यानिमित्त शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

माजलगाव शहरातील बायपास रोडवरील श्री मंगलनाथ मैदान येथे या शिवमहापुराणकथेनिमित्त भव्य असा मंडप उभारण्यात आला असून, २५ हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसांपासून या मैदानात मंडप व बैठक व्यवस्थेचे काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू होते ते आता पूर्ण झालेले आहे. ८ ते १६ डिसेंबरदरम्यान दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत शिवपुराण कथा होणार आहे. सोमवारी कथेच्या पहिल्या दिवशी श्री श्री १००८ महामंडलेश्वर परमपूज्य माँ कनकेश्वरी देवीजींच्या सान्निध्यात सकाळी ११ वाजता राजस्थानी मंगल कार्यालय ते श्री मंगलनाथ मैदान अशी भव्य शोभायात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरून काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सामील होऊन ह्या भव्य दिव्य, ढोल-ताशांच्या गजरात निघणाऱ्या ग्रंथदिडीत सहभाग नोंदवून सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन श्री सतगुरू सत्संग गोशाळा सेवा समिती यांनी केले आहे.

Comment here