महा-राष्ट्र

‘जावे विनोदाच्या गावा’मधून मराठी विनोद परंपरेचा जागर

मुंबईत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

 

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळ सभागृहात ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मराठी भाषेच्या संवर्धन आणि प्रसाराबाबत ठाम भूमिका मांडण्यात आली.

“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी” या ओळींचा उल्लेख करत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना अभिवादन करण्यात आले. संत, कवी, लेखक, अभ्यासक, शिक्षक आणि संशोधक यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मराठी ही महाराष्ट्राच्या नसा-नसांतून वाहणारी अस्मिता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

‘जावे विनोदाच्या गावा’ या कार्यक्रमातून मराठी विनोद परंपरेचा उजाळा देण्यात आला. यावेळी आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी शैलींचा विशेष उल्लेख करण्यात आला. संकटातही विनोद शोधणारा मराठी माणूस हीच आपली ओळख असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधोरेखित केले. मराठी ही व्यवहाराची भाषा म्हणून सर्व क्षेत्रांत प्रभावीपणे वापरली जावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींचे इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावेत, प्रशासनात मराठीचा वापर वाढावा आणि ती अर्थार्जनाची भाषा बनावी, यासाठी धोरणात्मक पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर, डॉ.नीलम गोऱ्हे, अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आमदार आशुतोष काळे यांच्यासह अनेक आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

Comment here