महा-राष्ट्र

नाशिकमध्ये ‘विश्व मराठी संमेलन २०२६’ चा दिमाखात शुभारंभ

मराठी अभिमानाचा जागतिक उत्सव; डिजिटल युगातही मराठी समर्थ

नाशिक : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२६’ च्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री उदय सामंत, गिरीष महाजन, छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. या संमेलनाच्या निमित्ताने राज्यासह देश-विदेशातून आलेल्या लेखक, कवी, अभ्यासक आणि मराठी साहित्यप्रेमींना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ही भूमी कुसुमाग्रजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली असून संत, विचारवंतांची परंपरा लाभलेली आहे. याच मातीत जन्मलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या ओव्यांमधून मराठी जीवनाचा गंध दिला. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही शिकवण देणारे साने गुरुजी यांचीही ही कर्मभूमी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

संमेलनात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांना ‘साहित्य भूषण’, ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’, तर गुरुवर्य मारूती बाबा कुरेकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच दिलीप धोंडगे, विनोद कुलकर्णी यांच्यासह इचलकरंजीचे आपटे वाचन मंदिर, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (कलबुर्गी) आणि नांदेडच्या निर्मल प्रकाशन या संस्थांचाही गौरव करण्यात आला.

“नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नाशिकशी असलेल्या ऋणानुबंधांचा उल्लेख करत साहित्य, संस्कृती आणि भाषिक अस्मितेला त्यांनी दिलेले बळ अधोरेखित करण्यात आले. मराठी विश्वकोश निर्मितीसारख्या उपक्रमांतून त्यांनी ज्ञानपरंपरेला संस्थात्मक रूप दिल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सांगितले. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून अस्मितेचा श्वास आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत असंख्य कष्टकरी व कामगारांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देत, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही उपमुख्यमंत्री पवार यांनी मानले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ‘मराठी ही पोटापाण्याची भाषा झाली पाहिजे’ हा विचार कायम मांडला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना वाढीव अनुदान, तसेच लंडन येथे उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनासाठी निधी मंजूर केल्याचा उल्लेख करत त्यांच्या कार्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिवादन केले. डिजिटल युगातही मराठीचा गोडवा, परंपरा आणि साहित्यसंपदा तितकीच सक्षम असल्याचे सांगत मराठी ही ज्ञान-विज्ञान, संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञानाची भाषा व्हावी”, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी व्यक्त केली. मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाने जपला पाहिजे, असा संदेश याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिला.

Comment here