आपला जिल्हा

माजलगाव तालुक्यातील पहिले ए.आय. आधारित हवामान केंद्र गंगामसला-तेलगाव खुर्द येथे कार्यान्वित

माजलगाव : मौजे गंगामसला व तेलगाव खुर्द येथे माजलगाव तालुक्यातील पहिले ए.आय.(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीसाठी हवामान केंद्र (वेदर स्टेशन) मंगळवार, दि.१७ फेब्रुवारी २०२६ रोजी उभारण्यात आले. तसेच शेतजमिनीत अत्याधुनिक सेन्सर बसवून शेती व्यवस्थापनाला तांत्रिक बळ देण्यात आले आहे.

हा उपक्रम केव्हीके बारामती, व्हीएसआय पुणे, फसल प्रा.लि. आणि एनएसएल शुगर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ऊस पिकासाठी आवश्यक हवामान माहिती, जमिनीतील आर्द्रता, तापमान, आर्द्रता टक्केवारी आदी बाबींची अचूक नोंद मिळणार असून शेतकऱ्यांना योग्य वेळी सिंचन, खत व्यवस्थापन व रोगनियंत्रणाचे निर्णय घेणे सुलभ होणार आहे.

सदर प्रसंगी फसल कंपनीचे तंत्रज्ञ अभिषेकजी मुंडे, एनएसएल शुगर्सचे जनरल मॅनेजर पारसनाथजी जयस्वाल, असिस्टंट जनरल मॅनेजर दत्तात्रयजी आहेरकर, सहाय्यक ऊस विकास अधिकारी विष्णू मालुरे, आदित्य सोळंके, मयूर आगे, गंगामसला आणि तेलगाव खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ए.आय.आधारित तंत्रज्ञानामुळे ऊस शेती अधिक वैज्ञानिक पद्धतीने करण्यास मदत होणार असून उत्पादनवाढीसोबतच पाण्याची बचत व खर्चात कपात होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तालुक्यातील शेती क्षेत्रासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

Comment here