माजलगाव : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ध्येयवादाला तत्त्वनिष्ठतेची जोड देत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांसह राजकारणात ॲड.सुधाकरराव देशमुख यांनी नैतिकतेचे अधिष्ठान ठेवून केलेले कार्य राजकारणातील नव्या पिढीला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगलाताई सोळंके यांनी केले.
दिवंगत ॲड.सुधाकरराव देशमुख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “स्मृतिगंध” या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला चळवळींच्या आधारवड मंगलाताई प्रकाशदादा सोळंके यांना “ॲड.सुधाकरराव देशमुख स्मृती पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख होते. व्यासपीठावर संयोजिका ॲड.सुलभाताई देशमुख, नगरसेवक डॉ.सचिन देशमुख, डॉ.रोहिणी देशमुख आणि ॲड. एस. आर.शर्मा उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंगलाताई सोळंके यांनी ॲड.सुधाकरराव देशमुख यांच्या दिशादर्शक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत स्मृती प्रतिष्ठान सामाजिक जाणिवेच्या भावनेने कार्यरत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी शाश्वत कार्य करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात माजी आमदार डी.के.देशमुख म्हणाले की, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवून जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक एकटा विरोधकही करू शकतो, हे ॲड.सुधाकरराव देशमुख यांनी राजकारणात दाखवून दिले. त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे सर्वच क्षेत्रात त्यांचा आदरयुक्त दरारा होता, असेही त्यांनी नमूद केले. तसेच मंगलाताई सोळंके यांच्या शैक्षणिक व महिला सबलीकरणाच्या क्षेत्रातील पारदर्शक कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी नगरसेवक डॉ.सचिन देशमुख यांनी ॲड.सुधाकरराव देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आणि या कार्यक्रमामागील भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली. मानपत्राचे वाचन दिग्दर्शक पद्मनाभ पाठक यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ.रोहिणी देशमुख यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन हिमांशू देशमुख यांनी केले आणि आभार ॲड.सुधांशु पाठक यांनी मानले. योगिता मोडक व धनंजय जाडे यांनी प्रार्थना व गीत सादर केले. या कार्यक्रमास शहरातील डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comment here