छत्रपती संभाजीनगर : भारतीय शास्त्रीय संगीत आणि वारकरी परंपरेचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवणारे प्रख्यात पखवाज वादक मृदंगमहर्षी पंडित उद्धवबापू आपेगावकर यांना १३ वा ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. १२ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात पखवाज वादनाची परंपरा जागतिक स्तरावर नेणारे मृदंगमहर्षी पंडित उद्धवबापू आपेगावकर यांना १३ वा ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील लोकमत लॉन्स येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांनी पत्राद्वारे या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. पंडित आपेगावकर यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सांगीतिक साधनेचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जात आहे. पद्मश्री दिवंगत शंकरबापू आपेगावकर यांचे सुपुत्र आणि पट्टशिष्य असलेल्या पंडित उद्धवबापू आपेगावकर यांनी पारंपरिक पखवाज वादनाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच फ्युजन संगीतातही त्याला मानाचे स्थान मिळवून दिले आहे. लंडनमधील प्रसिद्ध ऑपेरा हाऊससह अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या वादनाने रसिकांची दाद मिळवली आहे. दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतींना समर्पित या पुरस्कार सोहळ्यात प्रख्यात गायक नितीन मुकेश यांची विशेष उपस्थिती लाभणार असून संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम एक मोठी पर्वणी ठरणार आहे.



Comment here