सत्ता, पैसा आणि राजकीय वरदहस्ताच्या जोरावर उभं राहिलेलं साम्राज्य कितीही बलाढ्य दिसलं, तरी त्याची पायाभरणी जर अनैतिकतेवर असेल तर ते कधी ना कधी कोसळणारच, अशी भावना समाजात पुन्हा व्यक्त होत आहे. अलीकडच्या काही घटनांमधून अनेक प्रभावशाली व्यक्ती एका क्षणात वैभवातून सामान्य स्थितीत आल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर प्रामाणिक श्रम, स्वाभिमान आणि इमानदारीचं महत्त्व अधोरेखित होत आहे. “अनैतिकतेच्या खांबावर उभा असलेलं साम्राज्य कधीही कोसळू शकतं,” या भावनेची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. समाजात झपाट्याने वाढत असलेली पैशाची लालसा, रातोरात प्रसिद्धी मिळवण्याची स्पर्धा आणि कोणत्याही मार्गाने संपत्ती कमावण्याची मानसिकता यामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
सुरेश कुटे, वाल्मिक कराड, कॅप्टन अशोक खरात, कलेक्टर अविनाश पाठक ते शिवराज मोटेगावकर यांसारख्या अनेक प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींची उदाहरणं देत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. एकेकाळी सत्ता, पैसा आणि राजकीय पाठबळामुळे मजबूत वाटणारी ही नावं काही घटनांनंतर अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आणि त्यांच्या प्रतिमेलाही मोठा धक्का बसला. सामाजिक जाणकारांच्या मते, “शिळी भाकरी का असेना, ती स्वतःच्या कष्टाची असावी,” ही जुनी मूल्यव्यवस्था आजही तितकीच महत्त्वाची आहे. छोटंसं आयुष्य असलं तरी ते श्रम, सेवा, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणावर उभं असावं, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. पूर्वी समाजात गुणवान, चारित्र्यसंपन्न आणि बुद्धिमान व्यक्तींना मान-सन्मान दिला जायचा. मात्र सध्याच्या काळात आर्थिक स्थितीला अधिक महत्त्व दिलं जात असल्याची खंतही व्यक्त होत आहे. “खिशात पैसा नसेल तर माणसाचं अस्तित्व गौण मानलं जातं,” अशी मानसिकता वाढत असल्याने तरुणांमध्ये चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. समाजात वाढत चाललेल्या या प्रवृत्तीवर वेळीच नियंत्रण आणून प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याची गरज असल्याचं मत अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे.



Comment here