बीड : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या एकल महिलांचा गौरव करण्यासाठी २३ जून रोजी ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर सक्षमीकरणासाठी विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन यावेळी दिले जाणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विधवा दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार २३ जून हा दिवस ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून दि.२३ जून रोजी साजरा केला जातो. आणि महाराष्ट्रात आता हा दिवस एकल महिला दिवस म्हणून शासकीय पातळीवर साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार हा दिवस एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या आहेत. कार्यक्रमात महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध शासकीय अर्थसाहाय्य योजना, स्वयंरोजगार, बँक कर्ज आणि कायदेशीर हक्कांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मुलांचे संगोपन करणाऱ्या आणि समाजात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान एकल महिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात यावा. समाजात सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणे आणि एकल महिलांचे सक्षमीकरण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असेही कळविण्यात आले आहे. 



Comment here