आपला जिल्हा

माजलगाव बसस्थानकात मनीमंगळसूत्र चोरीचा प्रयत्न; महिला आरोपी रंगेहाथ ताब्यात

महिला पोलीस रीजवाना सय्यद यांची सतर्कता; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

माजलगाव : येथील बसस्थानक परिसरात एका महिलेचे सोन्याचे मनीमंगळसूत्र चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला आरोपीस माजलगाव शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, महिला पोलीस अंमलदार रीजवाना सय्यद यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई यशस्वी झाली असून पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०६ मे २०२६ रोजी फिर्यादी काशीबाई महादेव पोटभरे (वय ४५, रा.धनेगाव कॅम्प, ता.केज,जि.बीड) या दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माजलगाव बसस्थानक येथे धनेगावला जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र तुटून खाली पडले. संशय आल्याने त्यांनी मागे वळून पाहिले असता एका महिलेचा हात त्यांच्या खांद्यावर दिसून आला.

यावेळी बसस्थानक ड्युटीवर नियुक्त असलेल्या महिला पोलिस अंमलदार रीजवाना सय्यद यांनी तत्परता दाखवत संशयित महिला आरोपी पारबतबाई जगन्नाथ काळे (रा.रामेश्वरनगर, ता.जि.परभणी) हिला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात हजर केले. फिर्यादी काशिबाई पोटभरे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रामहरी पटाईत हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रल्हाद मुंडे, महिला पोलीस अंमलदार रीजवाना सय्यद, पोलीस अंमलदार नितीन नवले व महादेव बहिरवाळ यांनी केली.

Comment here