माजलगाव येथील श्री सद्गुरू मिस्कीन स्वामी मठ संस्थानमध्ये गुरूपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरूपौर्णिमा उत्सवात सहभाग नोंदविला. उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मठाधिपती श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांनी आशीर्वचनातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रत्येक पालकाला आपले मूल डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे असे वाटते; मात्र मुलांची आवड, क्षमता आणि कल ओळखून त्यांना त्यानुसार शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे अधिक महत्त्वाचे आहे. कोणत्याही समाजाची प्रगती ही शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे शिक्षणाशिवाय सर्वांगीण विकासाला पर्याय नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संस्थान मठातर्फे दरवर्षी वीरशैव लिंगायत समाजातील गरजू व गुणवंत ३१ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. लिंगैक्य तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी समाजहितासाठी सुरू केलेली ही शिष्यवृत्ती योजना पुढेही समर्थपणे सुरू ठेवली जाईल. गुणवंत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर जीवनात मोठी प्रगती करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. तसेच सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी संजीवन समाधीवर रुद्राभिषेक, लिंगैक्य तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या समाधीवर अभिषेक आणि श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांची पाद्यपूजा अशा विविध धार्मिक विधी भक्तिभावाने पार पडल्या. गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त संपूर्ण मठ परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेत गुरूंचे आशीर्वाद प्राप्त केले.



पेन्सिलमधून साकारले श्रीगुरूंचे हुबेहूब व्यक्तिचित्र
सोन्नथडी येथील कु.अमृता भिमेश्वर गुळवे हिने आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून श्रीगुरू चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांचे स्वहस्ते पेन्सिलने रेखाटलेले देखणे व्यक्तिचित्र भेट देऊन गुरुभक्तीची अनोखी भावना व्यक्त केली. महाराजांनी तिच्या कलागुणांचे कौतुक करत शुभाशीर्वाद दिले.



Comment here