बीड : बीड जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेता यावी, यासाठी क्रीडा संकुलात आवश्यक मूलभूत सुविधा, दर्जेदार साधनसामग्री आणि सरावासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून द्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. क्रीडा संकुलाला अचानक भेट देत त्यांनी विकासकामांची पाहणी करण्यासोबतच खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.
खेळाडूंच्या अडचणी थेट जाणून घेतल्या
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी बीड जिल्हा क्रीडा संकुलाला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. यावेळी त्यांनी संकुलात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. कामांची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि आवश्यक बाबींची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी युवकांचा सहभाग वाढविणे आणि नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील गुणवंत व नवोदित खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याला योग्य वाव मिळावा, यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. क्रीडा संकुलातील विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावरही त्यांनी भर दिला. खेळाडूंना प्रशिक्षण व सरावासाठी पोषक वातावरण मिळेल, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
‘राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवू’
क्रीडा संकुलात उपस्थित असलेल्या मुलांशी उपमुख्यमंत्री पवार यांनी आस्थेने संवाद साधला. कोणत्या खेळाचा सराव करता, प्रशिक्षण घेताना कोणत्या अडचणी येतात, तसेच कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याबाबत त्यांनी खेळाडूंकडून थेट माहिती घेतली. बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळविणारे खेळाडू घडावेत, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.



Comment here