महा-राष्ट्र

ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

साखर उद्योगातील उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान

गोवा : साखर उद्योगाच्या विकासातील उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक उत्कृष्टता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराची दखल घेत ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोवा येथे झालेल्या एसटीएआयच्या ८४व्या वार्षिक अधिवेशन व इंटरनॅशनल शुगर एक्स्पो २०२६मध्ये मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसटीएआय), नवी दिल्ली यांच्या वतीने १८ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान गोवा येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियममध्ये या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साखर उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, उद्योजक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर या अधिवेशनास उपस्थित होते. या सोहळ्यात ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी एसटीएआयचे अध्यक्ष, सिस्टाचे अध्यक्ष तसेच साखर उद्योगाशी संबंधित विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

साखर उद्योगाच्या विकासासाठी ओंकार शुगर ग्रुपकडून करण्यात येत असलेल्या कार्याची या पुरस्काराद्वारे विशेष दखल घेण्यात आली. साखर उद्योगासोबतच इथेनॉल, बायोएनर्जी, आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि उद्योगविस्तार या क्षेत्रांना समूहाकडून दिले जाणारे प्राधान्य हे या यशामागील महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. इंटरनॅशनल शुगर एक्स्पोमध्ये साखर उद्योगातील नवीन तंत्रज्ञान, नवकल्पना, ज्ञानाची देवाणघेवाण आणि भविष्यातील संधी यावर तज्ज्ञांनी विचारविनिमय केला. बदलत्या औद्योगिक परिस्थितीत आधुनिक व तंत्रज्ञानाधारित साखर उद्योग उभारण्याच्या दृष्टीने या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

‘ओंकार शुगर ग्रुप’ला मिळालेला हा पुरस्कार समूहाच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल असून, भविष्यात अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत साखर उद्योग उभारण्याच्या समूहाच्या वाटचालीला नवी प्रेरणा देणारा ठरला आहे. या उल्लेखनीय सन्मानाबद्दल ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील, संचालक ओमराजे बोत्रेपाटील, समूहातील अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी आणि हितचिंतकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comment here