आपला जिल्हा

किशोर कानडे व सचिन कराळे यांचा जलत्याग-अन्नत्याग; विविध पक्ष, संघटना व नागरिकांचा वाढता पाठिंबा

प्रत्यक्ष अतिक्रमण हटेपर्यंत माघार नाही; शिवस्मारकासाठी आमरण उपोषण सुरूच

माजलगाव : शहरातील शिवस्मारक परिसरासमोरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी शनिवार, दि.१ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. किशोर कानडे व सचिन कराडे हे जलत्याग व अन्नत्याग करून उपोषणास बसले असून, केवळ लेखी आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू झाल्यानंतरच आंदोलन मागे घेणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली.

माजलगाव शहरातील शिवस्मारक परिसरासमोरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी शनिवार, दि.१ ऑगस्ट आमरण उपोषणास सुरूवात झाली. या आंदोलनात किशोर कानडे व सचिन कराळे हे उपोषणास बसले असून, प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. उपोषणस्थळी आमदार प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, कल्याण आबुज, उध्दव नाईकनवरे, माजलगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सहाल चाऊस तसेच नगर परिषदेचे पदाधिकारी यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र, चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, केवळ लेखी आश्वासन किंवा हमीपत्र स्वीकारले जाणार नाही. प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. हे आंदोलन जलत्याग व अन्नत्याग स्वरूपाचे असल्याने प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन आंदोलनकर्त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या आंदोलनाला विविध स्तरांतील नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्यास परवानगी दिल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला असला, तरी नगर परिषदेकडून अद्याप प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. त्यामुळे कारवाईला नेमका विलंब कशामुळे होत आहे, नगर परिषदेसमोर कोणत्या अडचणी आहेत, की अतिक्रमणधारकांच्या दबावामुळे प्रशासन कारवाई टाळत आहे, असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, जोपर्यंत अतिक्रमण हटविण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध : आमदार प्रकाश सोळंके

माजलगाव : महापुरुष स्मारक बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट देऊन समितीच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. महापुरुष स्मारकांसमोरील अतिक्रमण हटविणे, शहर अतिक्रमणमुक्त करणे आणि समितीच्या इतर मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

माजलगाव येथे महापुरुष स्मारक बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महापुरुषांच्या स्मारकांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जागेसमोरील अतिक्रमण हटविणे, माजलगाव शहर अतिक्रमणमुक्त करणे तसेच समितीने मांडलेल्या इतर महत्त्वपूर्ण मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आमदार सोळंके यांनी स्पष्ट केले. या सर्व मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी माजलगाव नगरपालिका, पोलिस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून अतिक्रमण निर्मूलनाबाबत सुसूत्र नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यावर भर देत, प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून समितीने सुरू असलेले आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी केली.

माजलगावच्या अस्मितेसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला मोहनराव जगताप यांचा जाहीर पाठिंबा

माजलगाव : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात महापुरुष स्मारक बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मोहनराव जगताप यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.

माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात महापुरुष स्मारक बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मोहनराव जगताप यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. महापुरुषांच्या स्मारक परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटविणे, स्मारक परिसरातील डीपी (विद्युत रोहित्र) अन्यत्र स्थलांतरित करणे, रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करणे तसेच स्मारकाभोवती संरक्षणात्मक बॅरिकेडिंग उभारणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी जगताप यांनी माजलगाव नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. महापुरुषांचा सन्मान, शहराची अस्मिता आणि नागरिकांची सुरक्षितता यामध्ये कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मारकांचे जतन व संवर्धन ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मतही मोहनराव जगताप यांनी यावेळी व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांच्या रास्त मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Comment here